मा.खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे महावितरण समोर बेमुदत धरणे आंदोलन
कोल्हापूर प्रतिनिधी
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि शेतीपंपाची वीजबीले दुरुस्ती करुन द्यावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेटी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील शेतकऱयांनी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.वीजबील दुरुस्ती नाही तर बील भरणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शेतीला दिवसा सलग दहा तास वीजपुरवठा करावा,अन्यायी वीजबील वसुली व शेतीपंपाची चुकीच्या बीलाची तातडीने दुरुस्ती करावीत या मागण्यासाठी मंगळवार पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेटी यांच्या नेतृत्वाखाली आणि वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या उपस्थित शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
माजी खासदार राजू शेटी म्हणाले, शेतकऱयांना दिवसा वीज देण्याची गरज आहे. दिवसा वीज मिळण्याचा शेतकऱयांचा अधिकार आहे. येथील शेतकऱयांनी सर्वात जास्त थकबाकी पूर्ण केली आहे,वीजचोरी,गळती कमी आहे हे सिध्द करुन दाखवले आहे.रात्रीच्या वेळी शेतकऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे महावितरणने दिवसा वीज द्यावा.महावितरण कंपनीकडे राज्यातील काही धरणाचे वीजप्रकल्प आहेत.या प्रकल्पातून निर्माण होणाऱया वीज शेतीपंपासाठी द्यावी.
वीजतज्ञ प्रताप होगाडे म्हणाले,महावितरण शेतकऱयांचा वीजपुरवठा खंडित करत आहे.पण किमान पंधरा दिवसांची लेखी नोटीस दिल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करता येत नाही आणि तसा अधिकार नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कोणी आल्यास त्यांना हाकलून द्या.तसेच वीजबील दुरुस्ती होत नाही तोपर्यंत शेतकरी बील भरणार नाहीत असा इशारा दिला. या आंदोलनात कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील शेतकरी मोठय़ा सहंख्येने सहभागी झाले आहेत.