उचगाव भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित
वार्ताहर
उचगाव
उचगाव परिसरातील हेस्कॉमकडून करण्यात येणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित करत असल्याने या भागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत चालू न ठेवल्यास संबंधित अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराव घालून याचा जाब विचारला जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पाऊस, वादळ, वारा या काळात वीजपुरवठा खंडित झाला तर जनता एक वेळ समजून घेऊ शकते. मात्र सध्या अशाप्रकारची कोणतीच अडचण नसताना देखील सायंकाळी तसेच दिवसभरात अनेकवेळा विजेचा लपंडाव सुरूच असतो. ऐन रात्रीच्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची फारच गोची होते. अनेकवेळा रात्री बारा-एकच्या दरम्यान खंडित झालेला वीजपुरवठा थेट सकाळी सात – आठ वाजता सुरू होतो. सकाळी कामावर जाणाऱया कामगारांची तर अशा परिस्थितीत फारच गोची होते. संबंधितांना याबाबत विचारले असता विद्युतपुरवठय़ात बिघाड झाल्याचे कारण सांगून वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी वर्ग करतात.
शेतवडीतील सर्व पिके सध्या विहिरीतील पाण्यावरच अवलंबून असतात. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्युत मोटारी सुरू, बंद, यातच शेतकरी वर्गाला पळापळी करण्याची वेळ येते.
विजबिले भरूनही वीजपुरवठा खंडित का?
उचगाव परिसरातील सर्व नागरिक आपापली वीजबिले वेळेत व पूर्ण भरली जातात. वीजबिले वेळेत भरूनदेखील 24 तास वीजपुरवठा का दिला जात नाही? असा प्रश्न नागरिकांतून होत
आहे.
जर एखाद्या भागात दुरुस्तीचे काम असेल तर आगाऊ सांगणे महत्त्वाचे आहे.
अचानक दुरुस्ती आली तर तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. तरी या भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अन्यथा अधिकारी वर्गाला घेराव घालण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल याची दक्षता संबंधित अधिकारी वर्गाने घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.









