सुळगा ग्राम पंचायतमधील कारभारामुळे संताप : जि. पं. कार्यकारी अधिकाऱयांकडे तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
सुळगा (हि.) येथील मोहन शिवराम पाटील यांनी ग्राम पंचायतकडे आपल्या घराला रितसर विद्युत मीटर बसविण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान पैशांच्या मागणीनुसार संबंधित अधिकाऱयांना पैसेही दिले होते. मात्र काही दिवसांनंतर पाटील यांनी आपल्या अर्जाविषयी चौकशी केली असता तुम्ही अर्जच दिला नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना माघारी पाठविले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या पाटील यांनी जिल्हा पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
घराला नवीन मीटर बसविण्यासाठी रितसर ग्राम पंचायतकडून परवानगी आवश्यक असते. त्यामुळे मोहन पाटील यांनी ग्राम पंचायतकडे अर्जाद्वारे परवानगी मागितली होती. मात्र ग्राम पंचायतमधून अर्जच गहाळ झाल्याचे सांगण्यात आल्याने पाटील आश्चर्य चकीत झाले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ग्राम पंचायतला दिलेल्या अर्जाच्या झेरॉक्सवर ग्राम पंचायतीचा सही आणि शिक्का घेतला आहे. तरी याबाबत संबंधित ग्राम पंचायत अधिकाऱयांशी विचारले असता तुम्ही अर्जच दिला नसल्याची उत्तरे देण्यात येत आहेत.
यापूर्वीही असे प्रकार ग्राम पंचायतमध्ये घडले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ वेळेत मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून सही, शिक्क्मयाबाबतही चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी जिल्हा पंचायतकडे केली आहे.









