वेळास येथील घटना, वनविभाग, पोलिसांसह ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी/ मंडगड
बुधवारी पहाटे वेळास येथे विहिरीत बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पडलेल्या रनडुक्करास ग्रामस्थांनी वनविभाग व पोलिसांच्या मदतीने जीवनदान दिले. वनविभागाचा पिंजरा विहिरीत सोडून बाहेर काढलेले हे रानडुकर साखरी परिसरातील जंगलात सोडून देण्यात आले.
या बाबत वेळास येथील ग्रामस्थ हेरंब दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दांडेकर व दीपक वैद्य यांच्या सामाईक विहिरीत बुधवार पहाटे 5.30 च्या सुमार रानडुक्कर पडल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांसह वनविभाग व पोलिसांना या बाबतची माहिती दिली. यानंतर वनरक्षक एस. आर. गायकवाड, ए. आर. मंत्रे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे ए. एस. आय. आळे, वनरक्षक ए. बी. पाटील, सुरज जगताप घटनास्थळी पिंजऱयासह दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंजरा दोरीने बांधून विहिरीत सोडला. त्यानंतर पाण्यात पोहत असलेले रानडुक्कर काही क्षणात पिंजऱयात शिरले. यानंतर पिंजरा विहिरीतून वर काढण्यात आला. डुक्कर पिंजऱयात बंदिस्त झाल्याने ग्रामस्थांनी निःशास टाकला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. यानंतर पिंजरा गाडीत भरुन रानडुकरास साखरी येथील जंगलात सोडण्यात आले.









