चिपळूण/प्रतिनिधी
विहिरीत पडलेले काढणे लोखंडी शिगेने काढताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे घडली. या दुर्घटनेत दोन महिलाही जखमी झाल्या.
मिरजोळी गावातील फोटोग्राफर प्रेम प्रमोद जाधव ( 28 ) हे आपल्या पत्नीसह गावातील विहिरीवर गेले होते. यावेळी पाणी काढण्यासाठी असलेले काढणे हातातून निसटून विहिरीत गेल्याने ते काढण्यासाठी प्रेमने लोखंडी शिग आणली. मात्र काढणे काढताना ही शिग विहिरीजवळून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने काही कळायच्या आत शॉक लागून प्रेम जमिनीवर कोसळला. यावेळी विहिरीवर अन्य महिलांची गर्दी होती. त्यातच विहिरीवर लोखंडी जाळ्यांचे झाकण असल्याने त्याच्याशी संपर्क आलेल्या दोन महिलाही जखमी झाल्या. शॉक लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. प्रेमला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहचल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. कामथे रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री त्याच्यावर मिरजोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेम याच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे.








