वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
खासगी विमान कंपनी विस्तारा यांच्याकडून विशेष सवलत योजनेची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीकडून सवलतीच्या दरात तिकिट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 995 रुपयात विमान प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. विस्ताराच्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये सर्वसाधारण तिकिट दर 995 ते 1,995 आणि व्यावसायिक प्रवासाकरीता 5,555 पासून तिकिट उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरीता 14,555 रुपयापासून तिकिट दर ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांना 10 जानेवारीपर्यंत तिकिट बुकिंग करण्याची सुविधा मिळणार असून त्यांना प्रवास 25 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत करता येणार आहे. तिकिट विक्रीप्रमाणे मुंबई ते दिल्लीचा प्रवास 2955 रुपये आणि दिल्ली-पटनासाठी 2095 रुपयाचा दर लावण्यात येणार आहे.