प्रतिनिधी/ गुहागर
गणेश विसर्जनासाठी गुहागर तालुक्यातील बोऱयाजेटीवर गेलेले दोघेजण समुद्रामध्ये बुडाले होते. या दोघांचेही मृतदेह शुक्रवारी जेटीपासून शंभर ते पाचशे मीटर अंतरावर सापडले. मोठय़ा लाटेच्या दणक्याने एकूण सातजण समुद्रामध्ये पडले होते. यापैकी पाचजण बचावले आहेत.
वैभव वसंत देवळे (35) व अनिकेत हरेश हळये (21, दोघेही अडूर-भाटलेवाडी) अशी दोन मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अडूर-भाटलेवाडीतील गणेश विसर्जनासाठी बोऱया जेटीवर ते गेले होते. समुद्रावर गर्दी नको म्हणून अडूर-भाटलेवाडी येथील छोटय़ा-मोठय़ा गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी ते जेटीवर गेले होते. सुरुवातीला लहान मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मोठय़ा मूर्तीच्या विसर्जनासाठी जेटीच्या डाव्या बाजूला सर्वजण गेले होते. याचवेळी जेटीच्या उजव्या बाजूने आलेल्या मोठय़ा लाटेच्या दणक्याने सातजण समुद्रामध्ये फेकले गेले.

यापैकी सुधाकर हरिश्चंद्र देवळे व सचिन सुरेश हळये या दोघांना पोहता येत होते. त्यांनी समुद्रात पडलेल्या अन्य तिघांना जेटीकडे सरकवले. अनिकेतलाही त्यांनी जेटीकडे सरकवले होते, परंतु अनिकेतने धीर सोडला आणि जेटीपर्यंत पोहचण्याअगोदरच तो समुद्रात बुडाला. वैभवचाही हात पकडण्याचा प्रयत्न सुधाकर देवळे यांनी केला होता, परंतु तोसुद्धा बुडाला.
सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता तरूणांचा शोध घेण्यात येत होता, परंतु ते सापडले नाहीत. शुक्रवारी पहाटे 6 च्या सुमारास अनिकेत हळये याचा मृतदेह बोऱया जेटीपासून 100 मीटरवर ओहोटीमुळे बाहेर आला, तर वैभव देवळे याचा मृतदेह दुपारी 1.45 वाजता बोऱया बंदर जेटीपासून 500 मीटर अंतरावर सापडला. गुहागर पोलिसांनी या दोघांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.









