प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरांतील कचऱयाची उचल करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. वडगाव विष्णू गल्ली परिसरातील कचऱयाची उचल करण्यात येत नसल्याने सातत्याने तक्रार करण्यात येत आहे. पण स्वच्छता करण्याकडे मनपा अधिकाऱयांचे व कर्मचाऱयांचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी होत आहेत.
बाजारपेठेतील कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिकेकडून आटापिटा केला जातो. पण उपनगरांतील स्वच्छतेकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. शाळा, खुल्या जागा, उद्यानांशेजारी आदी ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचून दुर्गंधी पसरत आहे. पण स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. विष्णू गल्ली बसस्टॉपपर्यंत स्वच्छता केली जाते. पण येथील खालील परिसरात रस्त्यावर साचलेल्या कचऱयाची उचल करण्याकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. काही कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी येतात पण बसथांब्याशेजारी व मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करून निघून जातात. याबाबत मुकादम व स्वच्छता कर्मचाऱयांकडे तक्रार केली असता चालढकल करण्यात येते. त्यामुळे स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही.
अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात…
येथील गटारी स्वच्छ करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि गटारीतील घाण यामुळे परिसर अस्वच्छ बनला आहे. तसेच डासांचा उपद्रव वाढला आहे. सध्या खराब वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. अशातच अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वरिष्ट अधिकाऱयांनी विष्णू गल्ली वडगावसह परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









