वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूने कहर घडवून आणला आहे. होळीच्या दिवशी शनिवारी भागलपूरमध्ये 4 आणि मधेपुरामध्ये 4 जणांचा मद्यप्राशनानंतर संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तर एका व्यक्तीला दृष्टी गमवावी लागली असून काहीजण रुग्णालयात दाखल झाले आहेत. बांकामध्येदेखील विषारी दारूने 10 बळी घेतले आहेत. अन्यत्र विषारी दारूमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे.
भागलपूरच्या साहेबगंजप्रकरणी मृतांचे कुटुंबीय विषारी दारूचे प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. तर मधेपुराप्रकरणी कुटुंबीय आणि पोलीस काहीही बोलणे टाळत आहेत. तेथे रात्रीच तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. कुणाचेही शवविच्छेदन केले गेले नव्हते. भागलपूरमध्ये एकाच गावातील तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एका व्यक्तीला विषारी दारू प्राशन केल्याने दृष्टी गमवावी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 4 जणांच्या मृत्यूनंतर भागलपूरमधील लोक संतप्त झाले व त्यांनी निदर्शने केली. मधेपुरामध्ये कुटुंबीयांकडून तीन जणांच्या मृतदेहांवर घाईगडबडीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्युमुखी पडण्यापूर्वी संबंधित लोकांनी होळीच्या दिवशी मद्यप्राशन केले होते.
त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली होती. मृतांच्या कुटुंबीयांना खटल्याची भीती दाखवून शवविच्छेदन करविण्यापासून रोखण्यात आल्याची चर्चा आहे. या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करविण्याची मागणी नसल्याचे पोलिसांना लिहून दिले होते.