जिल्हाधिकाऱयांकडून तपासाचे आदेश, दारु दुकान सील
अलिगढ –
उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे विषारी दारु प्यायल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अजूनही काही लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रा भूषण सिंग यांनी दिला आहे. मृतांमध्ये जिल्हय़ातील करसुआ, निमाना, हैवतपूर, अंडला गावातील लोकांचा सहभाग असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
अलिगढ येथील थाना लोध क्षेत्रांतर्गत गाव करसुआमध्ये विषारी दारु प्यायल्याने 11 जणांचा जीव गेला आहे. त्यांनी गावातील दुकानातूनच दारु खरेदी केली होती. घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गावातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱयांनी गावातील दारुचे दुकान सील केले आहे. त्याचसोबत दारुचे सॅम्पल एकत्रित केले आहेत. या घटनेनंतर जिल्हय़ात खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबियांच्या आक्रोशानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तपासाअंती संबंधितांवर कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने दर्शवली आहे.









