तरुण भारत संवाद तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
शेतात काम करत असताना घोणस या विषारी सापाने दंश केलेल्या महिलेचा उपचारापुर्वीच अक्कलकोट येथे मृत्यू झाला. बोरगाव दे. येथील विठाबाई पंडित हत्तरके (वय ६०) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही घटना काल, शनिवार दि २१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांच्या पाश्चात पती दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पती पंडित हत्तरके व पत्नी विठाबाई हे दिवसभर आपल्या शेतातील ऊसात खुरपणी करत होते. शेतातील कामे आटोपून ते दोघे घरी निघाले होते. दरम्यान शेत ओलांडून डांबरी रस्त्याने गावाकडे जात असताना अचानक एस.टी बस आली. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पाठीमागे घेतल्या. यावेळी गवतात बसलेल्या विषारी घोणस सापावर त्यांचा पाय पडला असता सापाने त्यांना दंश केला. साप चावल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला इतक्यात लोक जमा झाले. आणि खासगी वाहनाने त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दिवसभर शेतात काबाडकष्ट करून घरी परतणाऱ्या मयत विठाबाई हत्तरके यांच्यावर काळाने घाला घातला. मयत विठाबाईच्या निधनाची बातमी पसरताच गावात शोककळा पसरली. मयत विठाबाई हत्तरके यांचे प्रेत शवविच्छेदन करून सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देणार असून मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेची खबर पती पंडित हत्तरके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे.
Previous Articleमंत्री आनंद सिंह यांनी मुख्यमंत्री बोम्माईंची भेट टाळली
Next Article काबुल विमानतळावर हल्ल्याची शक्यता









