वेंगुर्ल्यात पीठासन अधिकाऱयांचा निर्णय : कोकण उपायुक्तांकडे अपील दाखल करण्याचा निर्णय
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रावर सूचक व अनुमोदक म्हणून त्या-त्या समितीतील सदस्यांची नावे नसल्याने निवडणूक नियम 2006 प्रमाणे दाखल झालेले अर्ज पीठासन अधिकारी तथा प्रशासन नगरविकास अधिकारी संतोष जिरगे यांनी नामंजूर केले आहेत. त्यामुळे कोणताही अर्ज वैध न ठरल्याने वेंगुर्ले विषय समिती सभापती पदाची निवडणूक झाली नाही. या निर्णयाच्या विरोधात सत्ताधारी गट कोकण उपायुक्तांकडे अपिल दाखल करण्यात येणार आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेच्या विषय समिती निवडणूक प्रक्रियेस सोमवारी सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन नगरविकास अधिकारी संतोष जिरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वेंगुर्ले न. प.च्या नगराध्यक्षांसह 18 सदस्यांपैकी कृपा गिरप-मोंडकर या सदस्याव्यतिरिक्त सर्व 17 नगरसेवक उपस्थित होते.
वेंगुर्ले न. प. मध्ये महिला व बालविकास, पाणीपुरवठा व आरोग्य अशा तीन विषय समित्या आहेत. यापैकी महिला बालविकास समितीच्या सभापती या पदसिद्ध उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ आहेत. या समितीच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार होती. तसेच अन्य दोन समित्यांच्या सभापती पदांची निवड होणार होती. सभेच्या पहिल्या विषयान्वये या तिन्ही समित्यांवर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करायचे असते. न. प.तील दोन्ही गटांच्या तौलनिक संख्याबळाच्या आधारावर सत्ताधारी भाजप-शिवसेना-अपक्ष यांचे गटनेते सुहास गवंडळकर यांनी पाणीपुरवठा समितीवर प्रशांत वसंत आपटे व धर्मराज वामन कांबळी यांची नावे, आरोग्य समितीवर श्रेया मयेकर, सुहास गवंडळकर आणि महिला बालविकास समितीमध्ये साक्षी प्रशांत पेडणेकर यांची सदस्य म्हणून नावे दिली. तर विरोधी गटातर्फे पाणीपुरवठा समितीवर प्रकाश डिचोलकर, आरोग्य समितीवर विधाता सावंत व महिला बालकल्याण समितीवर कृतिका कुबल यांची नावे दिली होती.
विरोधी गटाकडून अर्ज नाही
या समित्यावरील सदस्यांचे गठन झाल्यावर पीठासन अधिकारी यांनी सभापती पदासाठी निवडणूक घोषित केली. सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत होती. विहित मुदतीत सत्ताधारी भाजप-शिवसेना-अपक्ष आघाडीकडून पाणीपुरवठा सभापती म्हणून प्रशांत आपटे, आराग्य समिती सभापती म्हणून श्रेया मयेकर यांचा अर्ज दाखल केला. यावर सूचक म्हणून त्या-त्या कमिटीतील सदस्यांच्या व अनुमोदक म्हणून न. प. सदस्य यांच्या सहय़ा होत्या. महिला बालविकास समिती उपसभापती पदासांठी कोणताही अर्ज दाखल केला नाही. तसेच विरोधी गटाकडूनसुद्धा तिन्ही समितीच्या सभापती पदासांठी कोणताही अर्ज दाखल झाला नाही.
सूचक, अनुमोदक म्हणून सदस्यांची नावे नाहीत
दुपारी 3.30 वाजता या अर्जची छाननी होऊन प्राप्त झालेले दोन्ही अर्ज अपात्र ठरविण्यात आले. यावर गटनेते सुहास गवंडळकर आणि सदस्य प्रशांत आपटे यांनी आक्षेप नोंदविला व कोणत्या कारणास्तव अर्ज नामंजूर करण्यात आला याची कारणे विचारली. त्यावर पीठासन अधिकारी जिरगे यांनी नामनिर्देशन पत्रांवर सूचक आणि अनुमोदक म्हणून त्या-त्या समितीतीलच सदस्यांची नावे नाहीत. सूचक म्हणून जरी समिती सदस्य असला, तरी अनुमोदक म्हणून ज्या सदस्यांने सही केली आहे, ते त्या समितीचे सदस्य नाहीत. म्हणून विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक नियम 2006 प्रमाणे हे अर्ज नामंजूर केले, असे सांगितले. त्यावर पुन्हा गटनेते सुहास गवंडळकर व प्रशांत आपटे यांनी एकाच जिल्हय़ात दोन-दोन वेगवेगळे नियम सभापती पदासाठी का लावण्यात आले? असा सवाल उपस्थित केला. त्यावर पीठासन अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील. आपण या निर्णयाविरोधात कोकण उपायुक्त यांच्याकडे अपिल दाखल करू शकता, असे सांगितले. त्यामुळे कोणताही अर्ज वैध न ठरल्याने वेंगुर्ले विषय समिती सभापती पदाची निवडणूकच झाली नाही.









