वृत्त संस्था/ पॅरीस
आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे घेण्यात येणारी विश्व सांघिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा 12 जुलैपासून खेळविली जाईल, अशी माहिती या स्पर्धेचे सीईओ कार्लोस सिल्वा यांनी दिली आहे. पण त्याचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
सदर स्पर्धा लीग पद्धतीने घेण्यात येणार असून 12 जुलैला या स्पर्धेला प्रारंभ होईल, अशी आशा सिल्वा यांनी व्यक्त केली आहे. सदर स्पर्धा तीन आठवडे चालणार असून या स्पर्धेच्या ठिकाणाची निवड पुढील आठवडय़ात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. सदर स्पर्धा टेक्सास आणि फ्लोरिडा येथे भरविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या सर्व एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत पण विश्व सांघिक लीग टेनिस स्पर्धेला आयटीएफ, एटीपी आणि डब्ल्यूटीए यांच्याकडून मान्यता घेण्यात आलेली नसल्याने त्यांच्या परवानगीची जरूरी नसल्याचे सिल्वा यांनी सांगितले.









