नवी दिल्ली : आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. कोरोना समस्येमुळे जवळपास एक वर्षाच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची संधी नेमबाजांना मिळाली नव्हती. आता भारताचे नेमबाज दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या स्पर्धेत भारताचे 57 नेमबाजांचे पथक सहभागी होत असून यामध्ये टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या 15 नेमबाजांचा समावेश आहे. पिस्तुल आणि रायफल नेमबाजी प्रकारामध्ये पहिल्यांदाच नेमबाजांना चांगली कामगिरी करण्याची संधी एक वर्षानंतर या स्पर्धेने उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान नेमबाजी प्रकारातील स्किट आणि ट्रपमध्ये स्पर्धकांना गेल्या महिन्यात कैरो येथे झालेल्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया अनिष भनवालाच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहील. त्याने येथे चांगली कामगिरी केल्यास त्याचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित होणार आहे.









