वृत्त संस्था/ दुबई
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना इंग्लंडच्या साऊदम्पटन येथे 18 जून रोजी आयोजित केला आहे. या अंतिम सामन्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नसून पूर्वीच्या नियोजनाप्रमाणेच तो घेतला जाईल, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट झपाटय़ाने पसरत असून देशातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे या स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या तारखेबाबत साशंकता निर्माण झाली. इंग्लंडने भारताला रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले असून यामुळे भारतातून इंग्लंडला जाणे शक्य नसेल. त्या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या शासनाबरोबर आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या संदर्भात चर्चा सुरू ठेवली आहे. सध्या तरी या सामन्यासंदर्भात कोणतेही भाष्य करणे अवघड असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या सामन्यासाठी भारतीय संघाला जूनच्या प्रारंभी इंग्लंडला प्रयाण करावे लागणार आहे. तत्पूर्वी या संघातील सर्व खेळाडूंना 10 दिवसांसाठी सक्तीचे क्वारंटाईन करण्यात येईल. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 2 लाख 59 हजार 170 कोरोनाचे नवे रूग्ण मिळाले आहेत. आतापर्यंत भारतातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1.5 कोटी पार झाली आहे.









