ऑस्ट्रेलियाची तिसऱया स्थानी घसरण, न्यूझीलंड दुसऱया क्रमांकावर
वृत्तसंस्था / दुबई
ब्रिस्बेनमधील कसोटीत ऑस्ट्रेलियासह सर्वांना चकित करणारा विजय मिळवित भारताने आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अग्रस्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियावर 2-1 फरकाने मिळविलेल्या मालिकाविजयानंतर भारताचे 430 गुण झाले असून त्यांनी न्यूझीलंडला (420) मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाची मात्र तिसऱया स्थानावर घसरण झाली असून त्यांचे 332 गुण झाले आहेत.
‘गब्बावर अतिशय संघर्षपूर्ण विजय मिळविल्यानंतर भारताने आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अग्रस्थानावर झेप घेतली आहे तर ऑस्ट्रेलियाची तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे,’ असे आयसीसीने ट्विटच्या माध्यमातून सांगितले. भारताने पाच मालिकांत 13 कसोटी खेळल्या असून त्यापैकी 9 जिंकल्या आणि तीन कसोटी गमविल्या आहेत. त्यामुळे एकूण गुणांपैकी भारताने 71.1 टक्के गुण मिळवित पहिले स्थान पटकावले आहे. इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
आयसीसी कसोटी सांघिक क्रमवारीतही भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत न्यूझीलंड 118.44 रेटिंग गुणांसह अग्रस्थानावर आहे. भारताचे 117.65 रेटिंग गुण झाले असून ऑस्ट्रेलिया 113 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.









