वृत्तसंस्था/ कौलालंपूर
2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा तसेच 2023 च्या आशिया चषक पात्र फेरीचे सामने मार्चऐवजी जून महिन्यात खेळविले जाणार आहेत. सध्या कोरोना महामारी संदर्भातील क्वारंटाईन नियम तसेच हवाई वाहतूक यांच्यावर निर्बंध घातल्याने पात्र फेरीचे हे सामने लांबणीवर टाकावे लागले आहेत.
कोरोना समस्येमुळे 2019 च्या नोव्हेंबरपासून दुसऱया फेरीतील पात्र फेरीचे सामने खेळविले गेलेले नाहीत. गेल्या वषीच्या नोव्हेंबरमध्ये पात्र फेरीचे सामने मार्चमध्ये खेळविण्याचा निर्णय एएफसीने घेतला होता. येत्या मार्च आणि जून महिन्यात या स्पर्धेतील सामन्यांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आल्या नाहीत. 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आशिया खंडातील बहुतांशी पात्र फेरीचे सामने मार्च महिन्यात घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. पण सध्या कोरोनाचा प्रसार पुन्हा नव्याने होत असल्याने पात्र फेरीचे सामने मे-जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहेत. जपान, ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया या देशांचे संघ सदर स्पर्धेसाठी हवाई प्रवासाने दाखल होणार असल्याने आता त्यांच्या अडचणीचा विचार करून या स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय एएफसीने घेतला आहे.
आशिया दुसऱया फेरीतील पात्र फेरीचे सामने कोणत्याही परिस्थितीत 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय फेडरेशनने घेतला आहे. 2021 च्या फिफाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकानुसार 22 ते 30 मार्च दरम्यान फर्स्ट विंडो तर 21 मे ते जून 15 दरम्यान दुसऱया विंडोतील सामने आयोजित केले आहेत. या दोन्ही विंडोमधील हे सामने विश्व करंडक स्पर्धेसाठी पात्र फेरीचे म्हणून ओळखले जाणार आहेत. चीनमध्ये होणाऱया आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाला आपल्या पात्रतेसाठी अद्याप तीन सामने खेळावे लागणार आहेत. भारताचा कतारबरोबरचा सामना भारतात होणार आहे. तर भारत-बांगलादेश हा सामना विदेशात तर भारत-अफगाण हा सामना मायदेशात होणार आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेत ई गटातून सध्या भारत तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या गटात कतार 13 गुणांसह पहिल्या तर ओमान 12 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.









