वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा अनुभवी आणि जागतिक दर्जाचा बुद्धिबळपटू माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने देशातील नवोदित बुद्धिबळपटूंना तयार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून यासाठी त्याने अकादमीची स्थापना केली आहे.
आनंदच्या या बुद्धिबळ अकादमीचे नामकरण वेस्ट ब्रीज-आनंद बुद्धिबळ अकादमी असे करण्यात आले आहे. पाचवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा विश्वनाथन आनंद आता देशातील युवा बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करणार आहे. या अकादमीमध्ये देशातील पाच अव्वल युवा बुद्धिबळपटूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 15 वर्षीय आर. प्रज्ञानंद, 16 वर्षीय निहाल सरीन, पंधरा वर्षीय रोनक साधवानी, 14 वर्षीय डी. गुकेश आणि 19 वर्षीय आर. वैशाली यांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी देशातील नवोदित होतकरू बुद्धिबळपटूंचा या अकादमीतर्फे शोध घेतला जाणार असून निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.









