प्रतिनिधी / पणजी
राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे लवकरच मुख्यमंत्री होतील व त्यांच्या मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकरसह अनेक संभाव्य मंत्र्यांची नावे व्हॉटस्ऍपवरील एका संदेशातून जाहीर झाल्यानंतर काल शुक्रवारी राज्यात एकच खळबळ माजली. विश्वजित राणे यांनी हे वृत्त सपशेल खोटे असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या सुदिन ढवळीकरांबरोबरच्या भेटीने अनेकांची झोप उडवली आहे.
राज्याच्या राजकारणात फार मोठे बदल होणार असल्याचे संदेश दिवसभर व्हॉटस्ऍपवर पसरले होते. सायंकाळी खातरजमा करता हा संदेश खोटा असल्याचे सिद्ध झाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि सुदिन ढवळीकर यांच्या दरम्यान शुक्रवारी झालेल्या भेटीने मात्र खळबळ माजली. दोन्ही नेत्यांनी आपण एकमेकाला भेटल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. माजी मंत्री व मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी आपण वैद्यकीय सुविधांसंदर्बात दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना फोंडा व मडकई मतदारसंघात आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी केल्याचे स्पष्ट केले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता चुकीचा संदेश सर्वत्र पसरलेला आहे. प्रत्यक्षात आपल्याला काहीही माहीत नाही, असेही ते म्हणाले. दोघांनीही आपण एकमेकांना भेटलो नाही, असे सांगितले असले तरी दोघेही नेते एकमेकाला भेटल्याचे अनेकांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचाच फोटो सर्वत्र व्हायरल झाला. वृत्त खरे असो वा खोटे ! या वृत्तामुळे मात्र सर्वत्र खळबळ माजली. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिकडेच भाजपच्या काही नेत्यांनी सुदिन ढवळीकर यांची दोन वेळा भेट घेऊन झाले गेले विसरू जा. पुन्हा एकत्र येऊ या असा संदेश दिला. सुदिन ढवळीकर यांनी सर्वांत प्रथम म्हणजे मंत्रिमंडळाच्या आकारात सध्या कपात करा. काटकसर सुरू करा. मगच विचार करतो, असे सांगितले होते. शुक्रवारी वॉट्स्ऍपवरून जनतेत संदेश पोहोचला तो विश्वजित राणे मुख्यमंत्री होणार म्हणून! हा संदेश खोटा असल्याचे मागाहून एकमेकाला कळविले असले तरीही लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्यांमध्ये या विषयावरून चर्चा झाली. राजकीय नेत्यांनीही एकमेकांत चर्चा केल्याचे वृत्त आहे.









