वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कैरोमध्ये होणाऱया आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज संघटनेने शुक्रवारी भारतीय संघाची निवड केली असून या संघामध्ये मनू भाकरसह अन्य अनेक ऑलिम्पियन नेमबाजांचा समावेश करण्यात आलेला नाही.
या स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज संघाची निवड करताना राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली नाही. या स्पर्धेत किमान मानांकन गुणांची अट घालण्यात आली होती. कैरोमध्ये होणाऱया विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी निवड चाचणीच्या अटी पूर्ण करता न आल्याने भारताचे ऑलिम्पिक नेमबाज मनू भाकर, अपूर्वी चंडेला, अंजुम मोदगिल, अभिषेक वर्मा, दीपक कुमार, यशस्विनी देसवाल यांना संघात स्थान मिळू शकले नाही. सदर स्पर्धा 26 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान कैरोमध्ये होणार आहे. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाज संघाबरोबर सहा प्रशिक्षक कैरोला रवाना होतील. दीपाली देशपांडे, समरेश जंग, मनोज कुमार, डी. एस. चांदेल, रोनक पंडित आणि वेदप्रकाश तसेच दोन फिजिओ भारतीय संघाबरोबर राहतील.
कोरोना महामारी समस्येमुळे जानेवारी महिन्यात घेतली जाणारी निवड चाचणी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे पात्रतेसाठी अंतिम मानांकन गुणांचा निकष लावून नेमबाजांची निवड करण्यात आली. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील नेमबाज 9 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत एकत्रित येतील. त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांच्यासाठी सराव शिबिर राहील. सराव शिबिर संपल्यानंतर भारतीय नेमबाज संघ 25 फेब्रुवारीला कैरोला प्रयाण करेल.
भारतीय नेमबाज संघ- 50 मी. रायफल थ्री पोझिशन- पुरुष- ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, अखिल शेरॉन, किरण अंकुश जाधव, संजीव रजपूत, 10 मी. एअर रायफल- पुरुष- दिव्यांश सिंग पनवर, रुद्राक्ष बाळासाहेब पाटील, एस. दत्ता, 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल- पुरुष- अनिश, भावेश शेखावत, गुरुप्रितसिंग, 10 मी. एअर पिस्तूल- पुरुष- केदारलिंग उचगणवे, सौरभ चौधरी, गौरव राणा, पी. सिंग.
50 मी. रायफल थ्री पोझिशन- महिला- सिफ्त कौर सामरा, श्रीयांका सदनगी, 10 मी. एअर रायफल- महिला- श्रेया अगरवाल, आयुषी गुप्ता, राजश्री संचेती, 25 मी. स्पोर्ट्स पिस्तूल- महिला- रिदम सांगवान, इशा सिंग, राही सरनोबत, 10 मी. एअर पिस्तूल- महिला- इशा सिंग, पी. श्रीनिवेता, रुचिता विनेरकर, 50 मी. रायफल थ्री पोझिशन- मिश्र सांघिक- ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर-सिफ्त कौर सामरा, अखिल शेरॉनöश्रीयांका सदनगी, 10 मी. एअर रायफल- मिश्र सांघिक- दिव्यांश सिंग पनवर-श्रेया अगरवाल, रुद्राक्ष पाटील्öआयुषी गुप्ता, 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल- मिश्र सांघिक- अनिश, रिदम सांगवान, भावेश शेखावत, ईशा सिंग, 10 मी. एअर पिस्तूल- मिश्र सांघिक- केदारलिंग बाळकृष्ण उचगणवे, ईशा सिंग, सौरभ चौधरी, पी. श्रीनिवेता.









