वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील कोलॉन येथे झालेल्या विश्वचषक पुरूष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने समाधानकारक कामगिरी करताना नऊ पदकांची कमाई केली. भारताच्या महिला बॉक्सर सिमरनजीत कौर आणि मनिष यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
या स्पर्धेच्या पदक तक्त्यामध्ये भारताने दुसरे स्थान मिळविताना तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्य अशी एकूण नऊ पदके मिळविली. महिलांच्या 57 किलो वजन गटात मनिषने भारताच्या साक्षीचा 3-2 अशा गुणांनी तर सिमरनजीत कौरने 60 किलो वजन गटातील अंतिम लढतीत जर्मनीच्या माया क्लिहेन्सचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पुरूषांच्या विभागात भारताच्या अमीत पांघलने 52 किलो वजनगटात एकमेव सुवर्णपदक पटकाविले. 91 किलोवरील पुरूषांच्या गटात भारताच्या सतीशकुमारने रौप्यपदक मिळविले. दुखापतीमुळे त्याने अंतिम लढतीत माघार घेतली. सोनिया लाथेरने 57 किलो गटात, पुजा राणीने 75 किलो गटात, गौरव सोळंकीने 57 किलो गटात आणि मोहम्मद हुसामुद्दीनने 57 किलो वजन गटात कास्यपदके मिळविली. या स्पर्धेत यजमान जर्मनी, बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, फ्रान्स, मॉल्डोव्हा, हॉलंड, पोलंड आणि युक्रेन या देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते.









