वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)
येथे रविवारी झालेल्या विश्व चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने एकूण 4 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताच्या अतेनु दास, धीरज बी. आणि तरुणदीप राय या तीन तिरंदाजपटूंनी पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात चीनच्या तिरंदाजपटूंनी सूवर्णपदकाची कमाई केली.
भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने विश्वचषक तिरंदाजी 2023 च्या स्टेज-1 स्पर्धेत नेदरलँडस, चीन तैपेई, इटली आणि जपान यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. भारताच्या बी. धीरजने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदक मिळविताना कजाकस्तानच्या अब्दुलीनचा 7-3 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामने महिलांच्या वैयक्तिक कंम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदक मिळविले. तसेच मिश्र सांघिक कंम्पाऊंड प्रकारात ज्योती आणि ओझस देवतळेने सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये भारताने 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदकांची कमाई केली.









