यू-19 युवा भारतीय संघ बेंगळूरमध्ये दाखल, अहमदाबादमध्ये आज मंडळातर्फे सत्कार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विक्रमी पाचव्यांदा यू-19 आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया भारतीय युवा संघाचे मंगळवारी जोरदार स्वागत करण्यात आले. कॅरेबियन भूमीत गत आठवडय़ात जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा हा संघ ऍमस्टरडम, दुबईमार्गे मंगळवारी सकाळी बेंगळूरमध्ये दाखल झाला.
संघातील सर्व सदस्य बेंगळूरमधून थेट अहमदाबादला रवाना झाले. तेथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आज (बुधवार दि. 9) त्यांचा गौरव सोहळा आयोजित केला जाणे अपेक्षित आहे.

एरवी, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांच्या प्रवासाची व्यवस्था आयसीसी करत असते. मात्र, येथे भारतीय खेळाडूंचा प्रवास वेगळा अनुभव देणारा ठरला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी निवडकर्ते व 5 अन्य राखीव खेळाडूंसह स्वतंत्र विमानाने लगोलग भारतात परतणे पसंत केले. त्यानंतर उर्वरित खेळाडू अन्य एका विमानाने भारतात आले.
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विंडीज क्रिकेट मंडळाचे आवर्जून आभार मानले. ही स्पर्धा दि. 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाली. भारताने इंग्लंडला मात देत या स्पर्धेचे जेतेपद काबीज केले. भारताने या वयोगटातील विश्वचषक जिंकण्याची ही विक्रमी पाचवी वेळ ठरली.
…तरीही, ‘त्या’ 8 युवा खेळाडूंना आयपीएलचे दरवाजे बंदच?
भारतीय युवा संघाने आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धा जिंकली असल्याने त्यांच्यासाठी लगोलग आयपीएल लिलावाचे दरवाजे उघडले जातील, असे वाटणे साहजिक असले तरी प्रत्यक्षात या विजेत्या संघातील 8 खेळाडूंना आयपीएल लिलावात स्थान मिळणेही कठीण असेल, असा एका गटाचा दावा आहे.
सध्याच्या नियमावलीनुसार, किमान एक प्रथमश्रेणी सामना खेळलेल्या किंवा लिस्ट ए क्रिकेटमधील लिलावात नावनोंदणी असलेल्या खेळाडूंनाच आयपीएल लिलावात सहभागी होता येते. या नियमाचा यष्टीरक्षक दिनेश बाणा, उपकर्णधार शेख रशीद, रवी कुमार, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अंगकृश रघुवंशी, मानव पारख, गर्व संगवान यांना फटका बसू शकतो. अर्थात, मागील 2 वर्षात प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा कमी प्रमाणात खेळवले गेले असल्याने सदर खेळाडूंना या नियमातून सूट देण्यात यावी, अशी मागणी मंडळाकडे केली गेली असल्याचे वृत्त आहे.









