‘मास्टर ब्लास्टर’चा विश्वचषकावर अविट ठसा..
? महान सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत एकंदरित 2 हजारांहून अधिक धावा जमविणारा एकमेव फलंदाज…9 मार्च, 2011 रोजी दिल्ली येथे नेदरलँड्सविऊद्धच्या सामन्यात त्यानं 28 धावांची खेळी करताना हा महत्त्वाचा टप्पा गाठला. तेव्हा त्याचं वय होतं 37 वर्षं, 319 दिवस अन् तो होता त्याच्या कारकिर्दीतील 40 वा विश्वचषक सामना…
? विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा जमविण्याचा मान जमा असलेल्या सचिनच्या खात्यात आहेत 45 सामन्यांतून 2278 धावा…दुसऱ्या क्रमांकावर 1743 धावांसह आहे तो ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग…
? सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचे ए. बी. डिव्हिलियर्स या दोघांनीही सर्वांत जलदरीत्या 1000 धावा पूर्ण केल्याहेत. सचिननं 1999 आणि डिव्हिलयर्सनं 2015 मध्ये त्याच्या 20 व्या डावात ही ऐतिहासिक कामगिरी केली. तेंडुलकरनं हा स्तर पार केला तेव्हा त्याचं वय होतं 26 वर्षं, 45 दिवस. त्यासरशी तो विश्वचषकाच्या इतिहासातील असा प्रताप गाजविणारा सर्वांत तऊण खेळाडू बनला…
? 1996 ते 2011 या कालावधीत पाच विश्वचषक स्पर्धांतून सर्वांत जास्त 46 सामने खेळण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगला जातो…तथापि, पाकिस्तानचा जावेद मियांदाद (1975, 1979, 1983, 1987, 1992, 1996) आणि सचिन तेंडुलकर (1992, 1996, 1999, 2003, 2007, 2011) यांनी सर्वाधिक सहा स्पर्धांमध्ये खेळण्याचा विक्रम केलाय. अन्य कित्येक खेळाडू पाच स्पर्धांत झळकलेत…
? विश्वचषकात सर्वाधिक शतकं झळकावलीत ती सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी. त्यांच्या नावे आहेत प्रत्येकी सहा शतकं. तथापि, रोहित शर्मानं इंग्लंडमधील 2019 च्या स्पर्धेत पाच शतकांची नोंद केली. एका स्पर्धेत इतकी शतकं कोणत्याही फलंदाजाला झळकावता आलेली नाहीत…

? विश्वचषकातील आपलं पहिलं शतक नोंदविणारे सर्वांत वयस्कर खेळाडू म्हणून नाव घ्यावं लागेल ते सुनील गावस्कर यांचं. ते त्यावेळी 38 वर्षं, 113 दिवस वयाचे. गावस्करनी 31 ऑक्टोबर, 1987 रोजी नागपूर इथं न्यूझीलंडविऊद्धच्या सामन्यात नाबाद 103 धावांची (85 चेंडूंत) ती तडाखेबंद खेळी केली…
? विश्वचषकात 150 हून अधिक धावा जमविणारे सर्वांत तरुण खेळाडू म्हणजे कपिल देव. ते 24 वर्षे, 163 दिवस वयाचे असतान त्यांनी 18 जून, 1983 रोजी झिम्बाब्वेविऊद्ध ट्रेंट ब्रिज, वेल्स इथं नाबाद 175 धावांची झंझावाती खेळी केली अन् दारुण पराभवाच्या उंबरठ्यावरील भारताला विजय मिळवून दिला…
? एका विश्वचषक सामन्यात अर्धशतक झळकावणं आणि पाच बळीही घेणं अशी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी साध्य करता आलीय ती फक्त दोन खेळाडूंना. अशी करामत करणारा युवराज सिंग हा पहिला. 6 मार्च, 2011 रोजी बेंगळूर इथं आयर्लंडविऊद्धच्या लढतीत आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर त्यानं दहा षटकांत 31 धावा देऊन 5 बळी टिपले आणि नाबाद 50 धावांची खेळी केली…दुसरा खेळाडू बांगलादेशचा शाकिब अल हसन…
? विश्वचषकात एकूण 500 पेक्षा जास्त धावा काढणं आणि 25 हून अधिक बळी घेणं फक्त पाच खेळाडूंना जमलंय. यात समावेश होतो पाकिस्तानचे इम्रान खान (666 धावा, 34 बळी), भारताचे कपिल देव (669 धावा, 28 बळी), ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ (978 धावा, 27 बळी), श्रीलंकेचे सनथ जयसूर्या (1165 धावा, 27 बळी) आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन (1146 धावा, 34 बळी)…यापैकी शाकिब हा एकूण 1000 पेक्षा जास्त धावा जमविणारा आणि 30 पेक्षा जास्त बळी घेणारा एकमेव खेळाडू…









