प्रतिनिधी/ चिपळूण
उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी महाविकास आघाडीने नगराध्यक्षांकडे विशेष सभा घेण्याची मागणी केली आहे. ही सभा घेण्याचा अधिकार त्यांचाच आहे. तरीही त्यांना कोणत्याही अडचणी नकोत म्हणून याबाबत मुख्याधिकाऱयांकडे कायदेशीर मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे ते काय मार्गदर्शन करतात, सभा ऑनलाईन होते की सभागृहात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावणेचार वर्षे उपनगराध्यक्षपदावर असलेल्या निशिकांत भोजने यांनी सुरूवातीला भाजपबरोबर असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसला काही वर्षांनी हे पद देण्याचा दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे नाराज असलेल्या या दोन्ही पक्षांनी शिवसेनेच्या मदतीने भोजने यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणून त्यांना पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी 22 नगरसेवकांच्या सहय़ांचे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना पत्र देऊन यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी केली आहे.
तसे पाहिल्यास सभा घेण्याचा अधिकार त्यांचाच आहे. तरीही निर्णयात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी लेखी पत्राद्वारे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे सभेबाबत कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे. त्यामुळे विधाते नेमके काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार होते. मात्र आम्हाला ऑनलाईन सभा नको, सभागृहातच हवी अशी मागणी करीत या सभेला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. यावरून मोठे राजकारण रंगले होते. त्यामुळं अविश्वास ठरावासाठी नेमकी सभा कशी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









