80 हजार जणांकडून तिकीटे आरक्षित, कडक नियमावली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेकडून विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना प्रवास करण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत 80 हजारहून अधिक प्रवाशांनी 16.15 कोटी रुपयांची तिकिटे आरक्षित केली आहेत. दिल्ली ते मध्यप्रदेशातील बिलासपूर या मार्गावर पहिली रेल्वे धावण्याच्या काही वेळातच ही माहिती सादर करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे आरक्षण करण्याची सोय सोमवारी रात्रीपासून सुरु करण्यात आली आहे.
रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे येत्या सात दिवसांसाठी 16.15 कोटी रुपयांच्या तिकीटांचे आरक्षण करण्यात आले आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱया सेवेअंतर्गत या तिकिटांवर जवळपास 82,317 लोक प्रवास करतील.
देशातील मुख्य शहरांना जोडणाऱया रेल्वे सुरु होणार असून यात डिब्रूगढ, अगरतळा, बिलासपूर,भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळूर, चेन्नई, मडगाव, मुंबई, अहमदाबाद आणि जम्मू तावी आदी मार्गावर या रेल्वे धावणार आहेत.
विशेष नियमावली
प्रवाशांना आपले जेवण आणि चादर घेऊन यावे लागणार आहे. आरोग्य तपासणीकरीता रेल्वे सुटण्याच्या अगोदर जवळपास 90 मिनिटे अगोदर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर हजर राहावे लागणार असून आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य असणार आहे. सदर प्रवाशांना गाडी सुटण्याच्या एक तास अगोदर तिकिट रद्द करता येणार आहे.









