शासनाच्या या निर्णयाविरुध्द विधिमंडळात आवाज उठवणार ; शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.आता विशेष मागासवर्ग आयोग गठित करण्याचे जाहीर केले आहे. पण पहिला मागासवर्ग आयोग असताना दुसरा कशासाठी अशी विचारणा करत ही समाजाच्या डोळयात धूळफेक आहे. याविरोधात कायदेशीर मार्गाने विधिमंडळात विरोध करणार. प्रसंगी शिवसंग्राम संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मराठा आरक्षणावरुन शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळात मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली नाही. यासंदर्भात शिवसंग्रामने बैठका घेण्याची मागणी केली. पण बैठकही घेतली नाही. ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. सत्तेत आल्यापासून शिवसेनेने सर्वच आरक्षणे बदलली असून पक्ष म्हणून शिवसेना कोणत्याही आरक्षणाबद्दल भूमिका मांडत नाही.
आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने विशेष मागासवर्ग आयोग गठित करण्याचे जाहीर केले आहे. पण पहिला आयोग असताना दुसरा आयोग गठित करणे म्हणजे मराठा समाजाच्या डोळय़ात धूळफेक आहे. याविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार. याबाबत सर्व आमदारांची बैठकही घेण्यात येणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरु असा इशारा विनायक मेटे यांनी दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक काम केले.पण आघाडी सरकारने न्यायालयात चांगले वकीलही दिले नाहीत अशी टीका केली. गायकवाड आयोगाचे काम चांगले असल्याचे मेटे म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला पाठिंबा
मराठा समाजाचे आरक्षण आणि मागण्यासंदर्भात कोणत्याही संघटनेने आंदोलन केले तर त्याला शिवसंग्रामचा पाठिंबा आहे.यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनालाही पाठिंबा आहे. – विनायक मेटे,अध्यक्ष शिवसंग्राम संघटना








