प्रतिनिधी / सांगली
विशिष्ट सणासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहीत मर्यादा राखून वापरण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सवलत दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दि. 5 सप्टेंबर 2016 व दि. 22 ऑगस्ट 2017 अन्वये प्राप्त अधिकारानुसार व पोलीस अधिक्षक सांगली यांच्याकडील विनंती नुसार सदरचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. आंबेडकर जयंती, 1 मे, महाराष्ट्र दिन या सणांसाठी प्रत्येकी 1 दिवस, गणपती उत्सवासाठी 5 दिवस (गणेश चतुर्थी, पाचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस व अनंतचतुदर्शी), नवरात्री उत्सवासाठी 2 दिवस (अष्टमी व नवमी), दिवाळी (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस, 31 डिसेंबर या सणांसाठी प्रत्येकी 1 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
ही सवलत घोषित केलेल्या शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. घोषित शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर सांगली, उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण मंडळ, सांगली व पोलीस अधिक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.