अनुपानंदजी महाराजांचे प्रतिपादन : रामकृष्ण मिशनच्या वार्षिकोत्सवाला प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
आयुष्य जगत असताना दोन प्रकारचे मार्ग आपल्याला सापडत असतात. त्यातील एक जवळचा असतो तर दुसरा दूरचा असतो. जवळचा मार्ग असला तरी दूरचा मार्ग निवडून कष्ट करायला शिका. आयुष्यात आव्हाने पेलण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला तर कोणतेही संकट मोठे वाटणार नाही, असे तत्त्वज्ञान स्वामी विवेकानंदांनी मांडले. त्यांच्या याच तत्त्वज्ञानाचा आजही अवलंब आपण करीत आहोत, असे प्रतिपादन तिरुपती येथील स्वामी अनुपानंदजी महाराज यांनी केले.
रामकृष्ण मिशन आश्रमाच्या 16 व्या तीन दिवसीय वार्षिकोत्सव सोहळय़ाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी किल्ला येथील आश्रमाच्या सभागृहात युवा संमेलन पार पडले. युवावर्गाला मार्गदर्शन करताना अनुपानंदजी महाराज बोलत होते. व्यासपीठावर बेलूर मठाचे आचार्य स्वामी करुणाकरणजी महाराज, म्हैसूर येथील प्रा. अनंतरामू उपस्थित होते.
यावेळी अनुपानंदजी महाराज म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रे÷ संस्कृती म्हणून गणली जाते. या संस्कृतीची माहिती स्वामी विवेकानंदांनी जगाला करून दिली. संस्कृतीत असणारे तत्त्वज्ञान सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविले. ज्या देशात भारतीयांना प्रवेशही दिला जात नव्हता, त्या ठिकाणी भारतीय तत्त्वज्ञान स्वामी विवेकानंदांमुळे पोहोचल्याचे अनुपानंदजी महाराजांनी सांगितले.
करुणाकरणजी महाराज म्हणाले, मी कोण आहे? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. एकदा स्वत:मधील गुण समजले की आपण हवी तशी प्रगती करू शकतो. जापनीज चौथी-पाचवीचे विद्यार्थी दहावीची प्रश्नपत्रिका सहजरित्या सोडवू शकतात. कारण ते आपल्या ध्येयासाठी झपाटल्यासारखे काम करीत असतात. हा झपाटलेपणा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
युवावर्गाला विविध स्वामीजींनी यावेळी मार्गदर्शन केले. 1 हजारहून अधिक विद्यार्थी या युवा संमेलनामध्ये सहभागी झाले होते.









