अध्याय अकरावा
एखादी घागर काठोकाठ भरली असेल तर त्यात थेंबभर पाण्यालासुद्धा जागा नसते. त्याप्रमाणे सर्व विश्व ईश्वरव्याप्त असल्याने अन्य कुणाला त्यात रहायला जागा नसते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नजरेला दिसणाऱया सर्व चराचर वस्तुंना मुळातच अस्तित्व नाही हे मुक्तपुरुष खूप जाणून असतो आणि बद्ध व्यक्तीला हे बिलकुल मान्य नसते. त्यामुळे तो सर्व आप्त, घरदार, शत्रू मित्र यात गुंतून पडलेला असतो पण मुक्ताच्यादृष्टीने या सर्वांचं अस्तित्व म्हणजे पाण्यावरच्या बुडबुडय़ासारखा असतो. तो राहिला काय आणि फुटला काय त्याला काही फरक पडत नाही. कारण सर्व ईश्वरव्याप्त आहे असं तो नुसतं बोलत नाही तर अनुभवत असतो. जसं प्रल्हादाला सर्वत्र ईश्वराची उपस्थिती जाणवत होती म्हणून हिरण्यकश्यपूला त्यानं छातीठोकपणे सांगितलं की, तू दाखवतोयस त्या खांबात ईश्वर आहे आणि बद्ध असलेल्या हिरण्यकश्यपूला स्वतःतील ईश्वरसुद्धा दिसत नव्हता तर खांबातला काय जाणवणार? मुक्तपुरुषाची विवेकशक्ती म्हणजे काय चूक काय बरोबर हे ठरवण्याचं तारतम्य सदैव जागृत असतं तर बद्धपुरुष विवेकहीन असतो. विवेकाने बुद्धि अतिशय प्रगल्भ होते. तिला नित्य व अनित्य ह्यांचे ज्ञान होते पण ते ज्ञान खुरटलेले असते. खुरटलेलं असं म्हणायचं कारण म्हणजे जरी नित्यानित्यविवेक जागृत असला तरी इच्छा होत असतातच व त्या पूर्ण कराव्यात असा मोहही होत असतो. म्हणून विवेकबरोबर वैराग्याची गरज आहे. वैराग्य म्हणजे अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न वाटणं. म्हणून वैराग्याशिवाय विवेक वाढीला लागत नाही हे लक्षात ठेव. आणखी एक विशेष म्हणजे जर विवेकशक्ती नसेल तर वैराग्य तग धरू शकत नाही. कारण इच्छा का करायच्या नाहीत किंवा मिळेल त्यात समाधान का मानायचं हे विवेकशक्ती नसेल तर समजू शकत नाही. म्हणून वैराग्य केवढेही मोठे असले तरी विवेकाशिवाय ते आंधळं असतं असे समज. त्याला आपले अधःपतन कळत नाही. त्यामुळे तो अंधाऱया विहिरीत पडतो. आंधळा हत्ती माजला तर इकडे तिकडे धावत सुटतो. खड्डय़ात पडून संकटांत सांपडेन हे त्याला कळत नाही. त्याप्रमाणे विवेकावाचून वैराग्य लंगडे आहे. जेथे विवेक आणि वैराग्य एक होतात, तेथेच नित्याचा म्हणजे ईश्वराचा ध्यास घेतला जातो आणि अनित्याचा त्याग घडत असतो हेच आत्मज्ञानरुपी खडग होय. ते नैराश्याच्या तेजाने लखलखत असते. कारण आशेची निराशा झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही.
गुरुवाक्मयरूपी सहाणेवर घासून ते तीक्ष्ण करावे लागते आणि त्याच्या तडाक्मयाने संकल्पविकल्पासहवर्तमान संशयाला समूळ छेदून टाकते. त्याचा परिणाम म्हणून ‘असंभावना’ म्हणजे सत्य वस्तु असत्य वाटणे आणि ‘विपरीतभावना’ म्हणजे देहच आत्मा वाटणे या सर्व भावना व वासना निखालस तुटून जातात व आत्मस्वरूपामध्ये पुरुष जागा होतो. अविद्यारूप दीर्घस्वप्नामध्ये जो अनेकत्व अनुभवत होता, तो गुरुवाक्मयाच्या कृपा-थापटण्याने अद्वैतामध्ये जागा होतो.
मग द्वैताला ठावच राहात नाही. मी आणि माझे हे व्यर्थ होऊन जाते आणि अविद्याकृत भेदाचा संशय फिटल्यामुळे तो आत्मानुभव भोगू लागतो. मनुष्याला जाग आल्यावर स्वप्नाची आठवण होते, पण ते सहजच खोटे वाटते. मुक्तालाही जग तसेच दिसत असते. त्यामुळे तो त्या दोषापासून अलिप्त असतो. अशा प्रकारे मुक्ताचे वर्तन अलिप्त असते हे लक्षात ठेव. ‘कथं वर्तते’ म्हणजे तो कसा वागतो ? असा प्रश्न केला होता म्हणून प्रसंगानुसार हे विवेचन केले. आता ‘कथं विहरेत्’ म्हणजे तो विहार कसा करतो ? या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी उद्धवाचे मन खरोखर उतावीळ झाले आहे हे लक्षात आणून श्रीकृष्णांनी अगदी आपल्या जीवीची गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ज्याचे प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वृत्तीचे संकल्प पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, तो देहामध्ये राहात असूनसुद्धा त्याच्या गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो. सविस्तर पाहुयात पुढील भागापासून …..
क्रमशः







