प्रतिनिधी / कोल्हापूर
अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही विवेकवादी संघटना आहे. माणसाची सारासार विचार करण्याची शक्ती म्हणजे विवेकबुद्धी. सुखी जीवनासाठी विवेकवादाची गरज आहे. विवेकवादी समाजाच्या निर्मितीला प्रेरणा द्यायची आहे, अशा भावना प्रेरणा मेळाव्यातून व्यक्त झाल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर कार्यकर्त्यांचा प्रेरणा मेळावा नागोजीराव पाटणकर हायस्कूलमधे मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार होते. रोपाला पाणी घालून उद्घाटन झाल्यानंतर प्रास्ताविकात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी मेळाव्याची पार्श्वभूमी विषद केली.
कार्याध्यक्ष बाबासाहेब मुल्ला यांनी शाखेचा अहवाल मांडणे, गीत सादरीकरण पुस्तक प्रकाशन, कथा सादरीकरण, चर्चा व मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे नियोजन स्पष्ट केले. यानंतर प्रा. मीना चव्हाण यांनी लिहिलेल्या `तुका झालासे कळस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. चव्हाण यांनी संत तुकाराम आपल्या अभंगातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार मांडत होते म्हणून वैदिकांनी त्यांचा छळ केल्याचे स्पष्ट केले.
रेशन बचाव आंदोलनाचे नेते कॉ. चंद्रकांत यादव यांनी पुस्तक लेखनाची गरज सांगून, देशातील सर्व प्रकारचे शोषण नष्ट करण्याचे आवाहन केले. शोषण व्यवस्थेच्या प्रतिकांना आपल्या देशात पावित्र्य बहाल केले आहे. स्त्रियांना आणि शुद्राना धर्माच्या कर्मकांडात समान अधिकार नाहीत. अंनिस व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेते ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे ते म्हणाले. वार्तापत्राचे व्यवस्थापक राहुल थोरात यानी महाराष्ट्र अंनिसचा कार्यअहवाल मांडला.
मेळाव्यात प्रा. डॉ. छायाताई पोवार, प्रा. एस. के. नेर्ले, नगरसेवक अशोकराव जाधव, राज्य कमिटी सदस्य सीमाताई पाटील, राज्य कमिटी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, कळंबळकर गुरुजी, संजय रेंदाळकर, रमेश वडणगेकर, संजय सुळगावे, गीताताई हसूरकर, सुषमा सूर्यवंशी यांचेसह कोल्हापूर, करवीर, गडहिंग्लज, इचलकरंजी, पन्हाळा, नेसरी या शाखांतून कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजीत पाटील, सुनंदा चव्हाण, अजित चव्हाण, संजय सुळगावे, जयंत मिठारी, संजय मिठारी, रघुनाथ पाटील, सुनंदा पाटील, सुवर्णा मिठारी, सत्यजित साळुंखे, सुनिता पाटील, लता जगताप, अभिषेक मिठारी, दिव्वेश साळुंखे, ऋषिकेश मिठारी यांनी परिश्रम घेतले.