प्रवाशांचा पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद : प्रवाशांची संख्या कमी असली तरी बसफेऱया सुरूच

प्रतिनिधी /बेळगाव
संप आणि लॉकडाऊनमुळे साधारण दोन महिन्यांहून अधिककाळ बंद असलेली बससेवा सोमवारपासून सुरू झाली. त्यामुळे सुनेसुने झालेले मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा एकदा गजबजलेले पाहायला मिळाले. शहर आणि आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली असली तरी प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करून प्रवास करणे बंधनकारक आहे. शिवाय खबरदारी म्हणून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात प्रत्येक प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. बससेवा सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता.
जिल्हय़ात अनलॉक जारी करण्यात आला असून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी परिवहन महामंडळाच्या बससेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सोमवारी विविध मार्गांवर बसेस धावल्या. मध्यवर्ती बसस्थानकातून अनगोळ, वडगाव, येळ्ळूर, गुरुप्रसाद कॉलनी, सहय़ाद्रीनगर, मजगाव, कणबर्गी, सुळेभावी, कंग्राळी (बी. के.), मुचंडी, के. के. कोप्प, बस्तवाड, अलारवाड, मास्तमर्डी, उचगाव, गोजगा, कट्टणभावी, तीर्थकुंडये, संतिबस्तवाड, सावगाव, शिंदोळी, बसरीकट्टी, शाहूनगर आदी स्थानिक प्रवासासाठी बससेवा सुरू झाली. यासह निपाणी, हुबळी, धारवाड, चिकोडी, बैलहोंगल, गोकाक, रामदुर्ग, सौंदत्ती, खानापूर आदी लांब पल्ल्यासाठी बसेस धावल्या.
प्रवासादरम्यान बसचालक, बसवाहकांसह प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व बसस्थानकात पोहोचल्यानंतर सॅनिटाईज केली जात आहे. खबरदारी म्हणून बसस्थानकाच्या आवारात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. बसेस सुरू झाल्या असल्या तरी लांब पल्ल्याच्या काही बस बसस्थानकात प्रवाशांविना उभ्या होत्या. बसचालक व बसवाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बसचालक व बसवाहकांना शासनाच्या नियमानुसार बसच्या 50 टक्के प्रवासी घेऊनच बस प्रवास करावा लागत
आहे.
बसवाहक-चालकांना प्रमाणपत्र बंधनकारक
लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या बसचालक, बसवाहक व तांत्रिक कर्मचाऱयांना बससेवेत रुजू होण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र व कोरोना लसीकरण प्रमाणपत्र द्यावे लागले आहे. बसचालक व बसवाहक सतत प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून बसवाहक व बसचालकांना कोरोना निगेटिव्ह व लसीकरण प्रमाणपत्र देणे परिवहनने बंधनकारक केले आहे.
लांब पल्ल्याच्या बसेसना अल्पप्रतिसाद
पहिल्या दिवशी सुरू झालेल्या बससेवेला स्थानिक बसमध्ये प्रवासी दिसून आले. मात्र, लांब पल्ल्याच्या बसना प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे लांब पल्ल्याच्या काही बस जाग्यावर थांबून असलेल्या पाहायला मिळाल्या. प्रवाशांची संख्या कमी असली तरी बसफेऱया सुरू होत्या.
प्रवाशांची संख्या-परिस्थिती पाहून बसफेऱया वाढविण्यात येणार
लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. प्रवाशांची संख्या व परिस्थिती पाहून बसफेऱया वाढविण्यात येणार आहेत. शहर आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी बस धावत आहेत. कोरोना-लॉकडाऊनमुळे परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. सध्या आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महसुलावर परिणाम होणार आहे.
-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी, केएसआरटीसी)









