प्रतिनिधी / कोल्हापूर
नोंदणीकृत बांधकाम कामगार व घरेलू मोलकरीण यांना सणासाठी 10 हजार रूपयाचा बोनस द्यावा व विविध योजनांचा लाभ मिळावा या मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. येत्या 10 दिवसात दिवाळी बोनस जाहीर न केल्यास, 25 रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दसरा चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला.
या मागण्याचे निवेदन शाहुपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले. कोरोनामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने, कर्ज काढून आपल्या कुटुंबांचा उदर निर्वाह चालवावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये दसरा दिवाळी सण साजरा करण्यासाठी शासनाने किमान 10 हजार रूपये दिवाळी बोनस द्यावा अशी प्रमुख मागणी आहे.
कामगारांची प्रधानमंत्री जीवनज्योती योजना ही फक्त कागदावरच आहे. कारण 50 वर्षाच्या आतील कामगारांना मृत्यु आल्यास त्याला आर्थिक मदत मिळत नाही. सध्याची वयोमर्यादाची अट रद्द करावी व वारसांना 2 लाख रूपयाची आर्थिंक तरतूद करावी. कोरोना काळात नोंदीत कामगारांना घोषित केलीली आर्थिक मदत मिळावी. कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृती मिळावी, अटल कामगार आवास योजना सुरू करावी. अशा मागण्या या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.
10 दिवसात दिवाळी बोनस जाहीर न केल्यास 25 रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनाव्दारे दिला आहे. या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष संजय गुदगे, समाधान बनसोडे, प्रशांत वाघमारे यांनी केले.. मोर्चामध्ये घोषणा देत मोठया संख्येने महीलांचा समावेश होता.