वीरशैव-लिंगायत विकास निगमच्या अध्यक्षपदी बी. एस. परमशिवय्या
प्रतिनिधी/ बेंगळूर
अलिकडेच स्थापन झालेल्या वीरशैव-लिंगायत विकास निगमवर अध्यक्ष म्हणून बी. एस. परमशिवय्या यांनी नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंगळवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश दिला. याबरोबरच राज्यातील अनेक निगम-मंडळांवरही अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
मराठा विकास निगमपाठोपाठ मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी वीरशैव-लिंगायत विकास निगम स्थापनेचा आदेश दिला होता. सोमवारी या निगमसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले होते. आता या निगमसाठी नव्या अध्यक्षांचीही नेमणूक झाली आहे. अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेले परमशिवय्या हे बेंगळूरच्या विजयनगर येथील रहिवासी आहेत.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव असणारे यलहंकाचे आमदार एस. आर. विश्वनाथ यांची बेंगळूर शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. तसेच कर्नाटक राज्य कृषी उत्पन्न प्रक्रिया आणि निर्यात निगमच्या अध्यक्षपदी माजी आमदार सिद्धनगौडा चिक्कनगौडर यांची तर कर्नाटक राज्य बियाणे आणि सेंद्रीय प्रमाणीकरण संस्थेच्या अध्यक्षपदी विजापूरमधील भाजप नेते विजुगौडा पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. सविता समाज विकास निगम- एस. नरेशकुमार, वन विकास निगम- तारा अनुराधा, जैविक इंधन विकास निगम- माजी आमदार किरणकुमार, पुनर्निर्मितीक्षम उर्जा विकास निगम- चंदु पाटील, उप्पार समाज विकास निगमवर जी. के. गिरीष यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.
डॉ. आंबेडकर विकास निगमवर आमदार दुर्योधन ऐहोळे
मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांच्या निकटवर्तीय आमदार, भाजप नेत्यांना अधिक संधी देण्यात आली आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर विकास निगमच्या अध्यक्षपदी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तम्मेश गौडा यांची कर्नाटक विद्युत कारखाना निगमच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. कर्नाटक विश्वकर्मा समुदाय विकास निगमच्या अध्यक्षपदी बाबू पत्तार तसेच देवराज अर्स मागासवर्ग निगमच्या अध्यक्षपदी रघू आर. यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.