प्रतिनिधी / बेळगाव

जय भवानी महिला सोसायटी
जय भवानी महिला को-ऑप. सोसायटीचा तिळगूळ समारंभ नुकताच हिंदवाडी येथे सोसायटीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. चेअरमन पार्वती भातकांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. कोरोना हळूहळू कमी होत असून, सोसायटीतर्फे परिस्थितीचा अंदाज घेत मोजकेच कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व भगिनींना संक्रांतीचे वाण देण्यात आले.
याप्रसंगी संचालिका वर्षा जोशी, शीला शिरगुरकर, जयश्री रेवाळे, सुलभा नाईक, मनीषा कुंभोजकर व कळ्ळीमनी उपस्थित होत्या.

मराठा संस्कृती संवर्धन संघटना
मराठा संस्कृती संवर्धन संघटना, बेळगाव यांच्यावतीने संघटनेच्या महिला मंडळाचा तिळगूळ समारंभ नुकताच शनिमंदिरजवळील सभागृहात पार पडला. या समारंभाला अध्यक्षा म्हणून अलतगा येथील ब्रम्हलिंग हायस्कूलच्या शिक्षिका छाया देसाई, प्रमुख पाहुण्या म्हणून आरएलएस कॉलेजच्या प्राध्यापिका शीला घोरपडे होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी वेदिका चव्हाण-पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर पाहुण्यांचा परिचय आदिती देसाई यांनी करून दिला. यानंतर मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांना वाण देण्यात आले.
सूत्रसंचालन श्वेता देसाई यांनी केले. सुनिता कदम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा चव्हाण पाटील, सुप्रिया पाटील व महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्ा़खम घेतले.

गणाचारी गल्ली खाटिक महिला मंडळ
गणाचारी गल्ली, बकरी मंडई येथील हिंदू खाटिक महिला मंडळातर्फे नुकताच तिळगूळ समारंभ पार पडला. अध्यक्षा इंदिरा जाणवेकर यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व महिलांना वाण देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्षा छाया प्रभावळकर, सचिव विद्या घोडके, सहसचिव शीतल प्रभावळकर, खजिनदार संगीता पलंगे, जया जानवेकर, सरिता काळगे, शालन बेळगावकर, सुरेखा शेरेगार, सुमन व नंदा घोडके यांनी परिश्रम घेतले.
कुणबी समाज बेळगाव
कुणबी समाजातील महिलांचा तिळगूळ समारंभ जेड गल्ली शहापूर येथी सालेश्वर देवस्थानमध्ये पार पडला. यावेळी कुणबी महिला समाज महिला विभागाच्या अध्यक्षा धनश्री माईनकर, उपाध्यक्षा ज्योती नेवरेकर, सचिव वीणा घडशी, सहसचिव वनश्री घडशी उपस्थित होत्या.
स्वागतगीत झाल्यानंतर सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर होम मिनिस्टर स्पर्धा झाली. या स्पर्धेत अश्विनी घडशी व वैभवी घडशी या विजेत्या झाल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच गतवषी विद्यार्थ्यांसाठी झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली.
कालिका दैवज्ञ महिला मंडळ
येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा तिळगूळ समारंभ नुकताच जालगार गल्ली येथे पार पडला. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात होणारा हा उत्सव कोरोनामुळे साधेपणाने पार पडला. अध्यक्षा शुभांगी कारेकर यावेळी उपस्थित होत्या. महिला मंडळाच्या सदस्यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. यानंतर सदस्यांना हळदीकुंकू व वाण देण्यात आले. यावेळी सेक्रेटरी नीता शिरोडकर, खजिनदार शैलजा कारेकर, उपखजिनदार नम्रता महागावकर उपस्थित होत्या.









