प्रतिनिधी/ पणजी
तिसवाडी तालुक्यात सध्या गाजत असलेल्या मेरशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी जुने गोवे पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी मंत्री माविन गुदिन्हो यांचा भाऊ विल्सन गुदिन्हो व ताहीर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या 306 कलमाखाली हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मयत प्रकाश नाईक यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन विल्सन गुदिन्हो व ताहीर यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. जुने गोवे पोलिसांनी आता याप्रकरणी रितसर तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणातील संशयितांची चौकशी करण्यात येईल, असे पोलासांनी स्पष्ट केले आहे.
तक्रारीप्रमाणे योग्य ती कारवाई होणार : पोलीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश नाईक यांच्या कुटुंबियांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही संशयितांना त्वरित अटक करा अशी मागणी करीत मयत प्रकाश नाईक यांचे समर्थक काल रविवारी मोठय़ा प्रमाणात ओल्ड गोवा पोलीस स्थानकासमोर जमले होते. तक्रारीप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाईल ग्रुपवर एक एसएमएस पाठविला होता. त्यात त्यांनी संशयित ताहीर व विल्सन गुदिन्हो हे सतावणूक करीत असून आपल्याकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. नाईक यांच्या कुटुंबियांनी प्रकाश नाईक यांनी आत्महत्या केली नसून तो घातपातचा प्रकार आहे असा दावा केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार प्रकाश नाईक यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत ओल्ड गोवा पोलिसांनी अनेकांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. नाईक यांच्या कुटुंबियांनी तक्रारीत जी संशयितांची नावे दिली आहेत त्यांनाही समन्स बजावून चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.









