वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
कर्णधार केन विल्यम्सनच्या (412 चेंडूत 2 षटकार, 34 चौकारांसह 251) दमदार द्विशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी आपला पहिला डाव 7 बाद 519 धावांवर घोषित केला. दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात बिनबाद 49 धावा जमविल्या.
या कसोटीत विंडीजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली होती. खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडने 2 बाद 243 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार विल्यम्सन 97 तर रॉस टेलर 31 धावांवर खेळत होते. पहिल्या दिवशी केवळ 78 षटकांचा खेळ झाला होता. गुरुवारच्या धावसंख्येवरून विल्यम्सन आणि टेलर यांनी तिसऱया गडय़ासाठी 83 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या गॅब्रिएलने टेलरला झेलबाद केले. त्याने 6 चौकारांसह 38 धावा जमविल्या. टेलरने पहिल्या दिवसाच्या आपल्या धावसंख्येत केवळ 7 धावांची भर घातली.
कर्णधार विल्यम्सनने आपले कसोटीतील 22 वे शतक पूर्ण केले. निकोल्सने केवळ 7 धावा जमविल्या. ब्लंडेल 14 धावांवर पायचीत झाला. मिचेलने 9 धावा जमविल्या. एका बाजूने कर्णधार विलियमसनने तंत्रशुद्ध आक्रमक फटकेबाजी करत आपले द्विशतक झळकवले. कसोटी क्रिकेटमधील विलियमसनची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2015 साली श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात खेळताना विल्यम्सनने नाबाद 242 धावांची विक्रमी खेळी केली होती. चौफेर फटकेबाजी करताना विल्यम्सनने 412 चेंडूत 2 षटकार आणि 34 चौकारांसह 251 धावा झळकवल्या. खेळाच्या शेवटच्या सत्रात तो सातव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. जेमिसनने 64 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 51 तर साऊदीने 1 षटकारासह नाबाद 11 धावा जमविल्या.
कर्णधार विल्यम्सनने डावाची घोषणा केली त्यावेळी न्यूझीलंडने 145 षटकात 7 बाद 519 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडच्या डावामध्ये खेळाच्या पहिल्या दिवशी लेथमने 1 षटकार आणि 12 चौकारांसह 86 धावा जमविल्या होत्या. विंडीजतर्फे केमर रॉच आणि गॅब्रिएल यशस्वी गोलंदाज ठरले. रॉचने 114 धावात 3 तर गॅब्रिएलने 89 धावात 3 गडी बाद केले. जोसेफने 99 धावात 1 बळी मिळविला. कर्णधार होल्डर, चेस यांना बळी मिळविता आला नाही.
विंडीजने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरुवात करताना खेळाच्या शेवटच्या सत्रात 26 षटकात बिनबाद 49 धावा जमविल्या. पेग ब्रेथवेट 1 चौकारासह 20 तर कॅम्पबेल 1 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावांवर खेळत आहे. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस झाले असून विंडीजला संभाव्य फॉलोऑन टाळण्यासाठी 271 धावांची गरज आहे. या कसोटीत यजमान न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत आपले वर्चस्व राखले आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव- 145 षटकात 7 बाद 519 (डाव घोषित), ( विल्यम्सन 251, लेथम 86, यंग 5, टेलर 38, निकोल्स 7, ब्लंडेल 14, मिचेल 9, जेमिसन नाबाद 51, साऊदी नाबाद 11, रॉच 3-114, गॅब्रिएल 3-89, जोसेफ 1-99), विंडीज प. डाव- 26 षटकात बिनबाद 49 (पेग ब्रेथवेट खेळत आहे 20, कॅम्पबेल खेळत आहे 22).









