गोव्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता, आतापर्यंत सहाजण अटकेत
प्रतिनिधी/ पणजी
साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील चावडेवर धनवाडी येथे फ्लॅटमध्ये राहणारे विलास मेथर हे संशयित अल्ताफ बट्टीकर याने उभारलेल्या काँप्लेक्सच्या विरोधात ‘रेरा’ प्राधिकरणाकडे (रिएल इस्टेट रेग्युलेटरी ऑथरिटी) तक्रार दाखल करणार होते. म्हणूनच त्यांचा सुपारी देऊन काटा काढण्यात आला, अशी माहिती पोलीस तपासादरम्यन उघड झाली आहे. मेथर यांचा खून करण्यासाठी किती रुपये देण्याचे ठरले होते ते अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन लाख रुपये आगावू रक्कम देण्यात आली होती, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.
विलास मेथर खून प्रकरणातील सहाव्या संशयितालाही पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. संशयित गोवा सोडून पळण्याच्या मार्गावर असतानाच पर्वरी येथेच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संतोष पिल्लाई असे सोमवारी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या खून प्रकरणात आतार्पंत सहा संशयितांना अटक केली आहे.
भर रस्त्यावर दिवसाढवळ्या माणसाला पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा बुधवार 14 ऑक्टोबर रोजीचा हा प्रकार गोव्यात पहिल्यादांच झाला आहे. पर्वरीसह संपूर्ण गोवा हादरून गेला आहे. विविध माध्यमांतून मारेकऱयांच्या विरोधात आवाज उठविला जात होता. पोलिसांच्या कामगीरीकडे संपूर्ण गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. आत्तापर्यंत अटक केलेल्या संशयितांची पोलीस कसून उलटतपासणी करीत आहेत.
आतापर्यंत सहा जणांच्या आवळल्या मुसक्या
आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांमध्ये पवन श्रीकांत बडिगर (37, धुळेर शेटयेवाडी, म्हापसा), प्रशांत लक्ष्मण दाबोलकर (35, दाबोलीवाडा शापोरा, बार्देश), यांना शनिवारी दुपारी सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली होती. मुख्य सूत्रधार अल्ताफ बट्टीकर व खय्याद शेख यांना गोवा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती. इकबाल नानपूरी याला रविवारी अटक केली. हे पाचही संशयित पोलीस कोठडीत आहेत. संतोष पिल्लई याला काल सोमवारी रात्री गोवा पोलिसांनी पर्वरीत अटक केली आहे. आज मंगळवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
अल्ताफच्या बेकायदेशीरपणाविरुद्ध तक्रार
मुख्य सूत्रधार अल्ताफ बट्टीकर व मयत विलास मेथर यांच्यात बेकायदेशीर बांधकामावरून नेहमी वाद होत होते. अल्ताफने उभारलेल्या काँप्लेक्समध्ये 32 फ्लॅट व 10 बंगले आहेत. त्यापैकी काही फ्लॅट व बंगले विक्रीला गेले आहेत. काहींची अद्याप विक्री झालेली नाही. मयत विलास मेथरच्या मते या काँप्लेक्सचा काही भाग बेकायदेशीरपणे उभारण्यात आला असून त्याबाबत त्याने स्थानिक पंचायतकडे तक्रार दाखल केली होती. पंचायत मंडळ 20 ऑक्टोबरला बेकायदेशीर बाधंकामाची पाहणी करणार होते. आरटीआयच्या माध्यमातून मेथर यांनी योग्य ती कागदपत्रे मिळविली होती. कॉप्लेक्समध्ये जे लोक राहतात त्यांना आपल्या बाजूने वळविण्यास मेथर यशस्वी झाले होते. सर्वांचा वॉटस्अप ग्रुप करून अल्ताफ याच्या बेकायदेशीर कामाबाबत मेथर त्यांना माहिती देत होते.
विलास मेथर यांच्या खुनाचा असा घडला घटनाक्रम
विलास मेथर यांचा काटा काढण्यासाठी काही दिवसांपासून संधीची वाट पाहत होते. 20 पंचायत मंडळ पाहणी करण्यासाठी येण्याअगोदर काम करण्याची अल्ताफ याने पवनला ताकीद दिली होती. बुधवार 14 रोजी विलास मेथर पंचायतीमध्ये जाणार असल्याची माहिती संशयितांना मिळाली होती. त्यांनी त्वरित पणजीतील एका हॉटेलवर बसून मेथरचा काटा काढण्याचे नियोजन केले. पवन, प्रशांत, इक्बाल व संतोष हे चौघेही दोन दुचाकीवरुन पंचायत कार्यालयाकडे गेले. मेथर बाहेर येण्याची वाट पाहत उभे राहिले. मेथर आपले काम करून पंचायत कार्यालयाबाहेर आले. गाडीत बसून घरी जायला निघाले होते. चारही संशयितांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. साल्वादोर दु मुन्द पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो येथे मेथर यांची गाडी पोचली असता संशयितांनी दुचाकीने त्यांच्या गाडीवर मागून ठोकर दिली. जाब विचरण्यासाठी म्हणून मेथर खाली उतरले तेव्हा त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. दोन्ही संशयितांनी मेथर यांना मारहाण केली. दुसऱया एका दुचाकीने आलेल्या अन्य दोन संशयितांनी मेथर यांच्यावर पेट्रोल टाकले व पेटवून दिले. मेथर यांनी स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना गोमेकॉत भरती करण्यात आले. मात्र दुसऱया दिवशी उपचार घेत असताना मेथर यांचे निधन झाले होते.
पणजीतील ते हॉटेल कोणते? राजकीय व्यक्ती कोण?
पणजीतील ज्या हॉटेलमध्ये खुनाचे नियोजन सुरु होते, त्यावेळी तेथे एका राजकीय नेत्याचा खास माणूस संशयितांना येऊन भेटला होता. तो राजकीय नेत्याचा खास माणूस कोण, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. त्या हॉटेलचा शोध घेऊन हॉटेलच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेण्याच्या तयारीत पोलीस आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तपासकामात पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. संशयितांना हॉटेलमध्ये भेटून गेलेल्या व्यक्तीचाही पोलीस तपास करीत आहेत. एकूणच या खून प्रकरणात राजकीय नेत्याचा हात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
‘रेरा’कडे तक्रार करण्याअगोदरच काढला काटा
पंचायतीमधील तक्रारीनंतर विलास मेथर हे ‘रेरा’ प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करणार होते. रेराकडे तक्रार नोंद झाल्यास अल्ताफ याचा बांधकाम परवाना रद्द होण्याची शक्यता होती. तसेच कॉम्पलेक्समधील जे फ्लॅट व बंगले विकायचे बाकी आहेत तेही कोण विकत घेणार नव्हते. रेराकडे नोंद झालेल्या तक्रारींबाबतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असते. कुणीही ग्राहक फ्लॅट किंवा बंगले घेण्याच्या अगोदार ही वेबसाईट पाहून संबंधित बिल्डरसंदर्भात रेराकडे तक्रार आहे काय, याची पाहणी करतात. तक्रार असल्यास फ्लॅट किंवा बंगला घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाहीत. हे अल्ताफला चांगले माहिती होते. त्यामुळे मेथरने रेराकडे तक्रार करण्या अगोदरच त्याचा काटा काढण्यासाठी थेट पवन बडीगर याच्याशी संपर्क करून मेथर यांच्या खुनाची सुपारी देऊन टाकली व आगावू दोन लाख रुपयेही दिले होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.









