विरोधी पक्ष स्तब्ध आहेत. सुन्न झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत कसा मुकाबला करावयाचा याबाबत चिंतन आणि मंथन अजून फारसे सुरु झालेले नाही. भाजपच्या चार राज्यांतील विजयाने सारे विरोधकच गलितगात्र झाले आहेत. पुढील रणनीती बांधायला त्यांना वेळ लागणार आहे. उत्तर प्रदेशमधील यशामुळे 2024 च्या ‘महायुद्धा’ करता भाजपाला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि निवडणुकीच्या सहा महिने आधी भाजप काहीतरी धमाका उडवेल आणि परत सत्ता मिळवेल अशी भीती काहींना वाटते.
देशात भयंकर महागाई आणि बेकारीचा कहर माजला असताना मोदींचे नाणे मात्र अजून खणखणीत कसे? याचे कोडे देखील त्यांना पडलेले आहे. पंतप्रधानांची विश्वासार्हता जोपर्यंत कमी होत नाही तोवर विरोधी पक्षांची डाळ शिजणार नाही हे देखील गैरभाजप गोटात बोलले जात आहे.
दिवसरात्र ध्रुवीकरणाचे राजकारण करून भाजप ही जास्तीतजास्त 39 टक्क्मयांपर्यंत पोचलेली आहे. जर गैर-भाजप एकत्र आले तर 61 टक्के मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतील असे गणित काही विरोधी नेते मांडत आहेत. मे 2024 ला लोकसभा निवडणूक होणार असली तरी प्रत्यक्षात मोदी विरोधकांकडे अवघे 20 महिने आहेत.
पण गैर-भाजप पक्षांतील राग-लोभ संपत नाहीत. ‘आपण एक झालो नाही तर मोदी परत बोकांडी’ अशी भीती काहीजणांना वाटते तर बरेच नेते आपले प्यादे किती पुढे जाऊ शकते याचीच अजून बेरीज-वजाबाकी मांडण्यात गर्क आहेत. प्रत्येकजण ‘थोडा हटके, थोडा बचके’ चालतोय. काँग्रेसला अनुल्लेखाने मारणे सुरु झाले आहे, अथवा त्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष टोमणे मारले जात आहेत.
थोडक्यात काय तर विरोधी ऐक्य हे नेतृत्वाच्या चक्रव्यूहात अडकले आहे.
गेल्या आठवडय़ात राजधानीत याची प्रचिती आली. ‘शरद पवार यांना यूपीएचा अध्यक्ष करा’, अशी मागणी राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या राजधानीमध्ये झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. विशेष म्हणजे शरदरावांच्या उपस्थितीत ही मागणी झाली. या मेळाव्यानंतर काँग्रेसमधील असंतुष्टांचे नेते गुलाम नबी आझाद पवारांना भेटले हेही जाणकारांच्या नजरेतून सुटले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने अशी मागणी का करू नये? हा प्रश्नदेखील संयुक्तिक आहे. पवार कितीही मोठे नेते असले तरी काँग्रेसमध्ये असताना वेळोवेळी त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशिरपणे करण्यात आले आणि त्यातूनच त्यांनी पक्षाशी फारकत घेतली. 2024 साली त्याला 25 वर्षे होतील. काँग्रेसचे आज झालेले शक्तीपतन पवारांसारखे तालेवार नेते सोडून गेल्याने झाले आहे. दरबारी राजकारणातील लाळघोटय़ा संस्कृतीने आणि लावालाव्यांमुळे बऱयाच होतकरू नेत्यांचा पत्ता कापला गेला. यामुळे उरला तो गाळ.
कालपरवापर्यंत काँग्रेस नेतृत्वाच्या जवळची वाटणारी शिवसेना देखील आता तळय़ात-मळय़ात करू लागली आहे. केंद्र आणि भाजपशी जोरदार टक्कर घेणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा देशभर बनत असताना त्यांची महत्वाकांक्षा देखील जागू शकते.
थोडक्मयात काय तर काँग्रेसला खिंडीत पकडायचे राजकारण सुरू झाले आहे. पक्षाच्या दारुण पराभवाने यूपीएचे नेतृत्व ठरवण्याबाबत सद्याची वेळ धार्जिणी नाही याची खूणगाठ 10, जनपथने बांधली आहे. ‘पहिल्यांदा मोदींचा पराभव करू यात आणि मग नेतृत्वाच्या प्रश्नाला हात घालू यात’, असा युक्तिवाद करून राहुल गांधींचे सहकारी हे चालढकल करत आहेत. राष्ट्रीय नेत्यांमध्ये मोदी आणि भाजपशी दोन हात करण्यात राहुलच पुढे असल्याने सरतेशेवटी हे नेतृत्व त्यांच्याकडेच येईल असे काँग्रेसींचे मत आहे. नेतृत्वाचा प्रश्न सद्या लटकत ठेवणे ही काँग्रेसची रणनीती दिसत आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत काहीच हाती न लागल्याने ममता बॅनर्जी निराश झालेल्या आहेत. पण त्यांचा काँग्रेसवरील राग अजून गेलेला नाही. विरोधी पक्षांनी एक झाले पाहिजे पण त्याकरता काँग्रेसची वाट बघण्याची अजिबात गरज नाही, अशा त्या मानभावीपणे म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपने मते ‘लुटल्याने’ च समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचा पराभव झाला असा त्यांचा दावा आहे.
काँग्रेसलादेखील ममतांवर भरवसा राहिलेला नाही. ‘कधी भाजपच्या विरुद्ध सर्वांनी एकजूट झाले पाहिजे असे ममतादीदी म्हणतात तर कधी भाजप आणि काँग्रेसच्या विरुद्ध एक झाले पाहिजे असे म्हणतात. कधी काँग्रेसला नामशेष करून टाकले पाहिजे असे म्हणतात. त्यांच्यावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा?’ असा खडा सवाल अधीर रंजन चौधरी विचारत आहेत.
दरम्यान, निवडणुकीतील रणनीती शिकवण्यासाठीच जणू प्रशांत किशोर आता काँग्रेसकडे यायला निघाले आहेत अशी वृत्ते आहेत. ती कितपत खरी अथवा खोटी हे लवकरच कळेल. किशोर यांचे ममता बॅनर्जींच्या पक्षात फारसे चांगले चाललेले नाही हे ही तेव्हढेच खरे. इंदिरा गांधींच्या पक्षाला प्रशांत किशोर सारख्या निवडणूक सल्लागाराची जरूर पडावी याचाच अर्थ लोकांपासून पक्षनेतृत्व किती दूर गेले आहे असा होतो. किशोर काँग्रेसकडे आले तर गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
ममतांच्या गैर-काँग्रेसी तिसरी आघाडी उघडण्याच्या डावाला फारसा प्रतिसाद मिळत नाही असे दिसत आहे. देशातील 200 लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना आहे असे सांगत राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे भाजपविरोधी आघाडीतून काँग्रेसला कटाप करता येत नाही असाच संकेत देत आहेत. गेल्या आठवडय़ात कै. राम विलास पासवान यांच्या बंगल्यातून मोदी सरकारने चिराग पासवान यांचे सामान ज्या पद्धतीने बाहेर काढले त्यानंतर चिराग हे राजदबरोबर येणार असे दिसत आहे.अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी (आप) सोडली तर कोणत्याही गैरभाजप पक्षाला या निवडणुकीत यश प्राप्त झाले नाही आहे. पण केजरीवाल यांनी आतापर्यंत तरी विरोधी पक्षांचे ऐक्मय या मुद्याबाबत एक जबर अनास्था दाखवली आहे. केजरीवाल हे स्वतःच अति-महत्वाकांक्षी असल्याने ‘मिल बाट के खाओ’ चा प्रकार त्यांना फारसा मानत नाही असे दिसते. केजरीवाल यांचे ‘आपली आपणच शिकार करावी आणि खावे’ असे त्यांचे राजकारण राहिले आहे. जर ‘गुजरात मॉडेल’च्या जोरावर मोदी पंतप्रधान बनू शकतात तर ‘दिल्ली मॉडेल’च्या यशाने आपण का नाही? असाच त्यांचा सवाल दिसत आहे.
गैर-भाजप आघाडीच्या नेतृत्वपदाकरता बऱयाच नेत्यांनी पाण्यात गळ सोडून शांतपणे बसण्याचे ठरवलेले दिसते. कोणाच्या गळाला मासा लागणार ते येत्या वर्षभरात राजकीय घडामोडी कशा घडतात त्यावर अवलंबून आहे.
सुनील गाताडे








