पंतप्रधान मोदींचा टोला. वंदे भारतचा केला प्रारंभ, तेलंगणातील जाहीर सभेत भाषण
हैदराबाद / वृत्तसंस्था
आपला भ्रष्टाचार लपवू पाहणाऱया विरोधी पक्षनेत्यांना नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जबर तडाखा दिला आहे. ईडी आणि सीबीआय यांचे पंख कापण्याची मागणी करणारी त्यांची याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे. ते हैदराबाद येथे एका जाहीर सभेत भाषण करीत होते. ते तेलंगणा आणि तामिळनाडूच्या दौऱयावर आहेत. शनिवारी त्यांनी सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारतचा प्रारंभ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी हैदराबाद येथे पोहचले. त्यांचे हजारो भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. नंतर त्यांनी सिकंदरबाद येथे रेल्वे स्थानकावर उभ्या असणाऱया ‘वंदे भारत’ एक्स्पेसमध्ये प्रवेश केला. नंतर एका कार्यक्रमात त्यांनी सिकंदराबादहून तिरुपतीला जाणाऱया या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. या गाडीमुळे या दोन स्थानकांमधील प्रवासाला लागणारा वेळ कमी होणार आहे. या कार्यक्रमाला तेलंगणाच्या राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि इतर मान्यवर, तसेच भाजपचे असंख्य कार्यकर्ते तसेच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
विरोधकांवर हल्लाबोल
वंदे भारतला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्यांनी जाहीर सभेत भाषण केले. या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले. राजकीय नेत्यांवर कारवाई करणाऱया ईडी आणि सीबीआयला न्यायालयाने रोखावे अशीं मागणी करणाऱया विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्याचाही त्यांनी उल्लेख केला. या भाषणापूर्वी त्यांनी तेलंगणासाठीच्या अनेक विकास प्रकल्पांच्या कोनशीला स्थापन केल्या. एकंदर 113 कोटी रुपयांचे हे विकास प्रकल्प आहेत.
मुख्यमंत्री अनुपस्थित
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव वंदे भारत आणि प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. गेल्या वर्षभरात राव हे पंतप्रधान मोदींच्या तेलंगणातील एकाही कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. यामुळे ते टीकेचा विषय बनले आहेत. केंद्र सरकारने चालविलेल्या विकास प्रकल्पांमध्ये बाधा आणण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी विकास प्रकल्पांमध्ये राजकारण आणू नये. राज्य सरकारने केंद्राच्या विकास प्रकल्पांना सहकार्य न केल्यास राज्यातील जनतेचीच हानी होणार आहे. जनता हे ओळखण्याइतकी सूक्ष आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
आम्ही भ्रष्टाचार रोखावा की नाही ?
देशातील भ्रष्टाचार रोखणे हे केंद्रीय तपास यंत्रणांचे कामच असते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. केंद्र सरकारने भ्रष्टाचाराविरोधात अभियान चालविलेले असून ते काम करण्याचा आमचा कायदेशीर अधिकार आहे. आम्ही भ्रष्टाचार रोखू नये असे विरोधकांना व<ाटते काय ? भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक हानी गरीबांची होते. ती तशी व्हावी अशी सरकारची इच्छा नाही. आर्थिक व्यवहार प्रामाणिकपणे केल्यास अडचण नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
घराणेशाहीमुळे हानी
घराणेशाहीमुळे देशाची हानी होत आहे. भ्रष्टाचाराचे मूळ ही घराणेशाही आहे. केंद्र सरकारने या मुळावरच घाव घातला आहे. देशातील काही राजकीय घराणी देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर आपले नियंत्रण ठेवू पहात आहेत. ही स्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. सर्वसामान्य लोकांना याची पूर्णतः जाणीव आहे. याचीच धास्ती घराणेशाही मानणाऱया नेत्यांना वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.
विकास प्रकल्पांना चालना
ड पंतप्रधान मोदी यांच्याकडून तेलंगणात अनेक विकास प्रकल्पांची उदघाटने
ड सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसचा पंतप्रधान मोदींकडून आरंभ
ड घराणेशाही हे भ्रष्टाचाराचे मूळ, केंद्राचे भ्रष्टाचार नष्ट करण्याला प्राधान्य
ड पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची अनुपिस्थती









