ऑनलाइन टीम/तरुण भारत
सध्या महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत गोपीचंद पडळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी दापोलीत मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मोर्चा काढला, तर सांगलीत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘खोटं बोला, पण रेटून बोला, असं विरोधी पक्षाचं सध्या काम सुरू आहे. वैभल्यग्रस्त माणसं, वैफल्यग्रस्त नेते कोणत्या थराला जाऊ शकतात, याची पडळकर आणि सोमय्या ही दोन उदाहरणे आहेत. ते आवर घालण्यापलीकडे पोहोचले आहेत. अहिल्यादेवी होळकर आणि इतर सर्वच युगपुरुषांबाबत राजकारण होता कामा नये. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या हातून जर अहिल्यादेवींच्या स्मारकाचं उद्घाटन होत असेल आणि त्याला विरोध केला जात असेल तर विरोधकांच्या मानसिकतेत गडबड आहे,’ अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.