ऑनलाईन टीम / बेंगळूर
टीम इंडियाने २०२० मध्ये भारतीय भूमीवर सलग दुसरा मालिका विजय साजरा केला आहे. श्रीलंकेविरुद्धची टी२० मालिका २-० ने जिंकणाऱ्या विराट सेनेने आता ऑस्ट्रेलियालाही एकदिवसीय मालिकेत २-१ ने मात दिली. बेंगळूरमध्ये आज झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने ९ गड्यांच्या मोबदल्यात दिलेले २८७ धावांचे आव्हान भारताने सात गडी राखून पार केले.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या झंझावातासमोर ऑस्ट्रेलियाचे २८७ धावांचे आव्हान तोकडे ठरले. रोहित शर्माने (११९) शतकी खेळी केली तर विराट कोहलीने (८९) अर्धशतक साकारत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्यामुळे तीन गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे आव्हान लिलया पार केले. श्रेयस अय्यरने नाबाद ४४ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच स्वस्तात परतले. मात्र स्मिथने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला सावरले. त्याने १३१ धावांची दमदार खेळी केली. निर्धारित ५० षटकांत ऑस्ट्रेलियन संघाने ९ बाद २८६ धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक ४ बळी मोहम्मद शमीने घेतले. रविंद्र जडेजाने दोन तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.