बीसीसीआयचे वार्षिक करार घोषित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय कर्णधार विराट कोहली, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याचा डेप्युटी रोहित शर्मा व स्टार जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हे त्रिकुट बीसीसीआयच्या वार्षिक करारात ए प्लस श्रेणीत कायम आहे. या तिघांनाही वर्षाकाठी 7 कोटी रुपयांचे मानधन मिळेल. याशिवाय, अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला हंगामात बराच कालावधी दुखापतग्रस्त राहिल्यानंतरही करारात बढती मिळाली आहे.
गुरुवारी उशिराने जाहीर केलेल्या या करारश्रेणीत एकूण 28 खेळाडूंना 4 श्रेणीमधून करारबद्ध केले गेले आहे. सर्व क्रिकेट प्रकारात कोहली, रोहित व बुमराह हे तिन्ही खेळाडू खेळत आले असून तेच संघाचे यात आधारस्तंभ रहात आले आहेत. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला ए ग्रेडमध्ये बढती मिळाली असून यासाठी त्याला 5 कोटी रुपयांचे मानधन मिळेल. गतवर्षी तो बी ग्रेडमध्ये होता.
‘हार्दिक पंडय़ा इंग्लंडमध्ये कसोटी खेळेल, हे जवळपास निश्चित आहे आणि आमच्या अव्वल खेळाडूंपैकी तो एक असेल. अगदी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याच्यावर संघाची बरीच भिस्त असेल. त्यामुळे, त्याला करारश्रेणीत बढती मिळणे साहजिकच होते’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
नवोदित शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांना प्रथमच ग्रेड सी मध्ये 1 कोटी रुपयांचा करार बहाल केला गेला आहे. शार्दुल ठाकुर ग्रेड बी मध्ये आहे. भुवनेश्वर कुमार व केदार जाधव हे मात्र खालील करार श्रेणीत फेकले गेले आहेत. भुवनेश्वरला सातत्याने दुखापतींचा त्रास जाणवत राहिला असून तो आता सर्व क्रिकेट प्रकारातही समाविष्ट नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला देखील खराब फॉर्मचा मोठा फटका बसला असून तो ग्रेड ए मधून थेट ग्रेड सी मध्ये फेकला गेला आहे.
वनडे संघात जवळपास निश्चितपणाने खेळत आलेल्या शिखर धवनचे ग्रेड ए मधील स्थान जैसे थे राहिले असून कसोटी स्पेशालिस्ट रविचंद्रन अश्विन व चेतेश्वर पुजाराचा देखील यात समावेश आहे. मायदेशात इंग्लंडविरुद्ध 27 बळी घेणाऱया अक्षर पटेलचे करारश्रेणीतील स्थान कायम आहे. शेवटच्या गटात तरी स्थान मिळवण्यासाठी सदर खेळाडूने किमान 3 कसोटी सामने खेळलेले असणे आवश्यक असते. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध एकहाती सामने जिंकून देणारा रिषभ पंत सध्या ग्रेड ए मध्ये असला तरी नजीकच्या भविष्यात तो लवकरच ए प्लसमध्ये असेल, हे निश्चित मानले जाते.
बीसीसीआयची वार्षिक करारश्रेणी
ग्रेड ए प्लस (7 कोटी) ः विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह.
ग्रेड ए (5 कोटी) ः आर. अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा.
ग्रेड बी (3 कोटी) ः वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मयांक अगरवाल.
ग्रेड सी (1 कोटी) ः कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.









