सिडनी / वृत्तसंस्था
भारताविरुद्ध आगामी मालिकेत विराट कोहलीचे बडे सावज हेरणे, हे माझे मुख्य लक्ष्य असेल. याच बरोबरीने विराटला शांत ठेवणे, हाच एकमेव उपाय असेल, असे ऑस्ट्रेलियाचा स्पीडस्टार पॅट कमिन्स म्हणतो. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर आहे. त्या पार्श्वभूमीवर कमिन्स बोलत होता.
‘माझ्या मते, प्रत्येक संघात किमान 1 ते 2 अव्वल फलंदाज असतातच. काही संघांचे कर्णधारही फलंदाजीत मजबूत असतात. इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, ही आणखी काही उदाहरणे. सामना जिंकण्यापूर्वी अशा फलंदाजांना बाद करणे, हे कोणत्याही गोलंदाजाचे पहिले लक्ष्य असते. विराट जागतिक स्तरावरील अव्वल फलंदाज आहे आणि त्याला नियंत्रणात ठेवणे केव्हाही उत्तमच ठरेल’, असे कमिन्स येथे म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या या उंचापुऱया गोलंदाजाचा मर्यादित षटकांच्या व कसोटी क्रिकेट संघात उपकर्णधार या नात्याने समावेश असून संयुक्त अरब अमिरातीमधून परतल्यानंतर तो ऑस्ट्रेलियन पथकासमवेत 14 दिवसांसाठी क्वारन्टाईन आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने केकेआर संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
‘सिडनीत परतल्याचा विशेष आनंद आहे. आम्ही सर्व जण लॉकडाऊनमध्ये आहोत. पण, काही तास तरी सराव करता येतो. आयपीएल स्पर्धेदरम्यान जैवसुरक्षित वातावरणात राहिलो होतो आणि त्याचा आता सराव झाला आहे. आमच्या संघातील काही खेळाडूंनी मागील काही आठवडय़ात 14 टी-20 सामने खेळले. त्यामुळे, मर्यादित षटकांच्या मालिकेपासूनच उभय संघात जोरदार जुगलबंदी रंगेल’, असे कमिन्सने यावेळी नमूद केले.









