निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांचा खुलासा, त्या वादंगाबाबत मंडळाने अखेर मौन सोडले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा देऊ नये, अशी विनंती विराटला बीसीसीआय पदाधिकाऱयांसह जवळपास प्रत्येकाने केली होती, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले. दक्षिण आफ्रिका दौऱयाला रवाना होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत विराट कोहलीने आपल्याशी याबाबत कोणीही संपर्क साधला नाही, असा दावा करत थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर चेतन शर्मा यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट केली.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराटने बॉम्बगोळा फेकला, त्याचे सातत्याने पडसाद उमटत राहिले. वनडे नेतृत्वावरुन पायउतार केले जात असल्याचे मंडळाने केवळ 90 मिनिटे आधी सांगितले, असा दावाही विराटने त्यावेळी केला होता.
विराटचा हा दावा योग्य होता का, या प्रश्नावर चेतन शर्मा यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘जेव्हा बैठक सुरु झाली, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टी-20 विश्वचषक स्पर्धा उंबरठय़ावर असताना असे काही ऐकिवात आले तर काय प्रतिक्रिया असणार? त्या बैठकीत हजर असलेल्या जवळपास प्रत्येक सदस्याने विराटला टी-20 नेतृत्वाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची विनंती केली. आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर याबाबत विचार करता येईल, असेही त्याला सांगण्यात आले होते’, असे चेतन शर्मा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
‘भारतीय क्रिकेटच्या हिताकरिता विराटने नेतृत्वाची धुरा सांभाळत राहणे आवश्यक होते. पण, कदाचित त्याने आपला निर्णय त्यापूर्वीच घेतला होता. स्पर्धेच्या उंबरठय़ावर विराटने निर्णय घेतला तर त्याचा संघाच्या पूर्ण स्पर्धेतील वाटचालीवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे त्याला सांगण्यात आले. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व जय शाह यांनीही याबाबत विराटला फेरविचार करण्यास सांगितले होते. पण, यानंतरही विराट असे म्हणत असेल तर ते आश्चर्याचे आहे’, असे चेतन शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.
टी-20 नेतृत्व सोडल्यानेच वनडेचा वेगळा विचार करावा लागला
‘टी-20 व वनडे या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन प्रकारांसाठी दोन स्वतंत्र कर्णधार नेमणे कोणत्याच परिस्थितीत संयुक्तिक झाले नसते आणि विराटला टी-20 नेतृत्व सोडण्यास कोणीही सांगितले नव्हते. पण, यानंतरही त्याने टी-20 नेतृत्व सोडले आणि वनडेसाठी वेगळा कर्णधार नेमणे रास्त ठरत नसल्याने निवडकर्त्यांना वनडे नेतृत्वाचा वेगळा विचार करावा लागला. यामुळे वनडे क्रिकेटमधील निर्णय निवडकर्त्यांचा आहे तर टी-20 मधील नेतृत्वाचा निर्णय विराटचा आहे’, असे चेतन शर्मा यांनी येथे स्पष्ट केले.
विराटच्या 90 मिनिटांच्या त्या दाव्याबद्दल चेतन शर्मा काय म्हणाले?
दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी कसोटी संघनिवड झाली, त्याच्या 90 मिनिटे आधी आपल्याला वनडे नेतृत्वावरुन कमी केले जात असल्याचे सांगण्यात आले होते, असा विराटने यापूर्वी दावा केला होता. त्यावर एका प्रश्नाला उत्तर देताना चेतन शर्मा म्हणाले, ‘आमचा निर्णय झाल्यानंतर मी तातडीने विराटला फोन केला. आम्हाला या निर्णयाची माहिती निवड समितीच्या बैठकीत देणे योग्य वाटले नाही. त्यामुळे, मी त्याला फोन केला आणि या निर्णयाची माहिती दिली होती. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन स्वतंत्र कर्णधार योग्य ठरत नाहीत, हे त्यावेळी विराटने देखील कबूल केले आणि आमचा संवाद खुलेपणाने झाला. विराट निवड समितीच्या बैठकीला 5.30 वाजता आला आणि आम्ही त्याला वनडे नेतृत्वाबद्दल त्यापूर्वीच कल्पना दिली होती. वास्तविक, हा निर्णय कठोर होता. पण, काही वेळा असे निर्णय घेणे काळाची गरज असते’.
अजाझबद्दल तो निर्णय आम्ही घेतला असता तर?
भारतात एखाद्या खेळाडूबाबत काही निर्णय घेतला जातो, त्यावेळी निवड समितीला पहिले टीकेचे लक्ष्य केले जाते. पण, अगदी अलीकडेच न्यूझीलंडने भारताविरुद्ध डावात 10 बळी घेतल्यानंतर सुद्धा अजाझ पटेलला संघातून डच्चू दिला होता आणि यावरुन तेथे कोणता वाद झडला नव्हता, याची चेतन शर्मा यांनी येथे आठवण करुन दिली. असाच निर्णय भारतीय निवड समितीने घेतला असता तर मोठे वादंग झडले असते, असे ते म्हणाले.
विराट-रोहितमध्ये कोणतेही वाद नाहीत
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार रोहित शर्मा व कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यात कोणतेही वाद नाहीत, त्यामुळे, फक्त ज्या चर्चा रंगल्या आहेत, त्यावर काहीही ठरवू नका, असे चेतन शर्मा याप्रसंगी म्हणाले.









