नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतून विराट कोहलीने विश्रांतीची मागणी केलेली नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयने मंगळवारी दिले. विराटने आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी वनडे मालिकेतून विश्रांती देण्याची मागणी केली, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले, त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा खुलासा केला.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दि. 26 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत असून त्यात विराटकडे नेतृत्वाची धुरा असेल. त्यानंतर वनडे मालिकेला दि. 19 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
‘आतापर्यंत तरी विराट कोहलीने वनडे मालिकेतून विश्रांती देण्याची बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली किंवा सचिव जय शाह यांच्यापैकी कोणाकडेही विनंती केलेली नाही. नंतर याबाबत काही ठरवले जाणार का, हे आताच सांगता येणार नाही’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
दक्षिण आफ्रिका दौऱयावर खेळाडूंचे कुटुंबीय देखील सहभागी असणार आहेत. मात्र, श्रीलंकेविरुद्ध मायभूमीत होणाऱया मालिकेसाठी भारतीय खेळाडूंना आणखी 3 आठवडे बायो-बबलमध्ये रहावे लागणार असल्याने विराट येथे विश्रांतीची मागणी करु शकेल, असे तर्क व्यक्त होत होते. विराटची कन्या वामिकाचा दि. 11 जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने तो विश्रांती घेऊ शकेल, असे वृत्त काही माध्यमांनी यापूर्वी दिले होते.
विराट कोहली वर्कलोड मॅनेजमेंटचा नेहमी आग्रह धरत आला असून गतवर्षी 2020-21 मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया दौऱयातून पालकत्वाची रजा घेतली होती. शिवाय, मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामन्यातही तो खेळला नव्हता. आताही तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून ब्रेक घेईल किंवा लंकेविरुद्ध टी-20 मालिकेतून देखील माघार घेण्याची शक्यता आहे.









