मुंबई / वृत्तसंस्था
भारतीय कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वात गर्भश्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याचप्रमाणे तो सर्वाधिक उत्पन्न असणारा क्रिकेटपटूही आहे. त्याची लोकप्रियता अनेक डझन ब्रॅण्डससाठी खेचून आणणारी ठरली आहे आणि अर्थातच, ऑडी ही कार कंपनी देखील त्यात आघाडीवर आहे. ऑडी नवी कार लाँच केली जाते, त्यावेळी सर्वप्रथम ती न्याहाळण्याची संधी विराटलाच मिळते. या गर्भश्रीमंतीत विराटच्या ताफ्यात एकापेक्षा एक अलिशान कार असणे साहजिकच आहे. अर्थात, आश्चर्य म्हणजे दस्तुरखुद्द याच विराटची पहिली ऑडी कार महाराष्ट्रातील एका पोलीस ठाण्यात धूळ खात पडली आहे. एक बाब यात महत्त्वाची आहे की, ही कार पोलीस ठाण्यात धूळ खात पडली, त्यात विराटचा एक टक्काही दोष नाही.
आता, विराटकडे नवनव्या कार येत असतात, त्यावेळी जुन्या कारचे तो काय करतो, हा प्रश्न उपस्थित होईल तर जुन्या कारची विराट विक्री करतो. यापूर्वी ऑडी इंडियाने आर8 ही कार लाँच केल्यानंतर त्याने 2012 ऑडी आर8 ही आपली पहिली कार सागर ठक्कर या व्यक्तीला विकली.
कॉरटॉकने दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती एका घोटाळय़ात सापडली आणि त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. कॉल सेंटर घोटाळय़ात सापडल्यानंतर तो बेपत्ता झाला आणि मुंबई पोलिसांनी त्याच्या मालमत्तांवर छापे टाकले आणि यात ऑडी आर8 ही कार जप्त केली. अर्थात, सुदैवाने कोहलीने कारची विक्री करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती आणि यात तो अडचणीत आला नाही. पण, त्याची ऑडी श्रेणीतील ही पहिली कार सागर ठक्करमुळे मात्र अद्यापही पोलीस ठाण्यात धूळ खात पडली आहे. सागर ठक्करने विराटकडून ही कार 2.5 कोटी रुपयांना खरेदी केली होती.