गौतम गंभीर
मला असा आणखी कोणत्याही संघाचा कर्णधार दाखवा, जो आठ वर्षे कर्णधार असेल आणि यानंतर देखील त्याने एकदाही आयपीएल जिंकून दिली नसेल, अशी सुरुवात करत माजी भारतीय कर्णधार व माजी आयपीएल चॅम्पियन गौतम गंभीरने विराट कोहलीची आरसीबी कर्णधारपदावरुन हकालपट्टी करा, अशी आग्रही मागणी नोंदवली. विराट कोहली आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण, त्याला आजवर एकदाही आरसीबीला आयपीएल चषक जिंकून देता आलेला नाही. दुसरीकडे, गौतम गंभीर केकेआरचा माजी कर्णधार असून त्याने दोनवेळा आयपीएल जेतेपद मिळवून दिले आहे.
महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा हे आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत आणि त्या पंक्तीत विराटचा समावेश होत नाही, असे गंभीर पुढे म्हणाला. गंभीरने आयपीएल स्पर्धेबाबत बोलताना विराटच्या नेतृत्वावर सातत्याने टीका केली आहे. पण, यात वैयक्तिक काहीही नाही, असे तो म्हणतो.
आरसीबीने प्रदीर्घ काळ विराटला नेतृत्वावर कायम ठेवले. पण, किंग्स इलेव्हन पंजाबने रविचंद्रन अश्विनला नेतृत्व सिद्ध करता आले नाही, त्यावेळी दोन वर्षातच त्याची नेतृत्वावरुन उचलबांगडी केली, याकडे गंभीरने लक्ष वेधले. आठ वर्षांचा कालावधी खूप असतो आणि यात काही करुन दाखवता येत नसेल तर अशा कर्णधाराबद्दल गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे मत त्याने येथे व्यक्त केले. आरसीबीचा सध्याचा संघ पाहता, ते प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या देखील पात्रतेचे नव्हते, अशी खरमरीत टीका गंभीरने केली. एबी डीव्हिलियर्स काही मोक्याच्या क्षणी खेळला नसता तर आरसीबीची आणखी ससेहोलपट झाली असती, याचा त्याने शेवटी उल्लेख केला.









