सध्या सिनेइंडस्ट्रीत कलाकारांचे मैत्रीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा ट्रेंड आला आहे. कधी एकत्र मालिका, सिनेमा करताना तर कधी पुरस्कार सोहळय़ांमध्ये परफॉर्मन्स करताना केमिस्ट्री जुळते. मग मैत्री फुलते. त्यानंतर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा विचार पक्का होतो. तर अशा काही जोडय़ांनी एकत्र गेल्या वर्षभरात संसार मांडले आहेत. तर काही जोडय़ांचा साखरपुडाही झाला आहे. यामध्ये विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनीही एकमेकांना प्रपोज करत वर्णी लावली आहे. सध्या हे लव्हबर्डस लग्नाआधीचे गुलाबी दिवस एन्जॉय करत आहेत. नुकताच विराजस आणि शिवानीने व्हॅलेटाइन्स डे साजरा केला. तेव्हा गिफ्ट काय हवं असे जेव्हा शिवानीने विराजसला विचारले तेव्हा विराजसने मागितलेले गिफ्ट देऊन त्याची इच्छापूर्ती कशी करायची याचा विचार करून शिवानी सध्या चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. विराजसला शिवानीकडून तात्या विंचू बाहुला हवाय, पण तो खोटाखोटा नव्हे तर खरोखरच बोलणारा तात्याविंचू मिळावा अशी त्याची इच्छा आहे.
दहा वर्षापूर्वी पुण्यात डावीकडून चौथी बिल्डिंग या विराजसने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकात शिवानीने काम केले होते. पण त्यानंतर या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. एकतर दोघांचे होमटाऊन पुणे असल्याने गाठभेट व्हायची. पुढे दोघेही करिअरसाठी मुंबईत आल्यानंतर मैत्री घट्ट झाली. कधी सहज तर कधी ठरवून ही जोडी भेटू लागली. तर या दोघांच्या चाहत्यांना या जोडीचे सोशलमीडियावरचे फोटो आणि व्हिडिओ न चुकता पहायला मिळायचे. गेल्यावर्षी अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात शिवानी आणि विराजसने कपल कॉम्बो ड्रेसिंग लूक करत त्यांच्या रिलेशनशीपवर न बोलताच शिक्कामोर्तब केलं. मैत्रीच्या पुढे आपल्यामध्ये काहीतरी फुलतय याची जाणीव झाल्यानंतर विराजसनेच शिवानीला प्रपोज करायचे ठरवले. शिवानीला सरप्राइजेस खूप आवडतात. त्यासाठी विराजसने गोव्यातील समुद्रात एका क्रूझवर अत्यंत रोमँटिक वातावरणात शिवानीच्या बोटात अंगठी घातली. आता लव्हबर्डस म्हटल्यावर एकमेकांना गिफ्ट देणं् तर आलच.
पण विराजसची लहानपणापासून अशी इच्छा आहे की त्याच्याकडे एक तात्याविंचू असावा. झपाटलेला हा सिनेमा पाहूनच विराजसने आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याकडे हटट केला होता. खरतर रामदास पाध्ये यांची ओळख असल्याने मुलासाठी मृणाल कुलकर्णी तात्याविंचू बाहुला बनवून घेऊ शकल्या असत्या, पण विराजसला बाहुला नव्हे तर खरा तात्याविंचू हवा होता, जी त्याची इच्छा आजही अपूर्णच आहे. तेव्हापासून विराजसला कुणीही गिफ्ट काय हवे तर तो खराखुरा तात्याविंचू हवा असंच सांगायचा. अजूनही त्याच्या मनात ती इच्छा कुठेतरी आहेच. शिवानीनेही व्हॅलेटाइन्स डेसाठी काय गिफ्ट हवंय असं विचारल्यावर विराजसने खराखुरा तात्याविंचू मागितला. आता आली का पंचाईत. विराजसला खरा तात्याविंचू कुठून आणून दयायचा याचे मात्र शिवानीला टेन्शन आले आहे.
संकलन – अनुराधा कदम









