कोकरूड प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील विरवाडी येथील निवृत्ती हणमंत पाटील यांच्या बकरीच्या पाल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले असून यामध्ये शेतकऱ्याचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पश्चिम भागातील बऱ्याच गावामध्ये बिबट्याचा वावर दिसून येत आहे. चार दिवसापूर्वी बिळाशी येथील बाळू ज्ञानू पाटील यांनी ऊसामधे शेळी व पालव्यांना चरावयास सोडले होते,ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यासमोरच पालव्यावर हल्ला करून ठार केले. शिराळकर वस्ती जवळ पवन यमगर यांनी रानात बसवलेल्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एका बकऱ्याला ठार केले. त्याचबरोबर हा बिबट्या बिळाशी परिसरातील वीरवाडी, धसवाडी, या परिसरामध्ये शेतकऱ्यांना दिसून आला होता.मंगळवारी पहाटे बिळाशी येथील बाजीराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ तीन बिबटे दिसून आले आहेत.
गेली आठ दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. विरवाडी येथील निवृत्ती हणमंत पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या गुरांच्या शेडमध्ये शेळी व तिचे पालवे होते. पहाटेच्या वेळी आलेल्या बिबट्याने यातील एका पालव्याला हल्ला करून ठार केले. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरात बिबट्या वावर दिसून येत असल्याने, त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे. घटनास्थळी वनरक्षक प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिकारी कृष्णा माळी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.